Uncategorized
Trending

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावात तब्बल 43 वर्षांनंतर 28 एप्रिल रोजी महालक्ष्मी यात्रेचे ग्रामस्थ व पंच कमिटीच्या वतीने आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी ही एक यात्रा ठरणार आहे. यात्रेला अवघे काही दिवस उरले असताना प्रशासनाने पूर्वतयारीला वेग दिला आहे.

यात्रेदरम्यान दररोज सुमारे एक ते दीड लाख भाविक गावात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, यासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आमदार चनराज हट्टीहोळी तसेच सहाय्यक आयुक्त श्रवण नायक उपस्थित होते.

बैठकीत उत्सव समितीने प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या. वाढत्या गर्दीचा विचार करता काकती, एपीएमसी आणि माळमारुती या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या गावासाठी अधिक पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर 24 तास आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, अखंड वीजपुरवठा, तसेच अग्निशामक दलाची गाडी नऊ दिवस उपलब्ध ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

यात्रेच्या कालावधीत बससेवा वाढविणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवणे यावरही भर देण्यात आला. हिंडाल्को संस्थांकडून सहकार्य घेत पाणीपुरवठा मजबूत करण्याची योजना मांडण्यात आली.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्व मागण्या सकारात्मक दृष्टीने मान्य करत आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हाधिकारी निधीतून गावासाठी दोन हायमास्ट दिवे देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. संबंधित विभागांना तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले.

दरम्यान, आमदार चनराज हट्टीहोळी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्या निधीतून सुमारे 15 कोटी रुपयांच्या विकासकामांना गती देण्यात आली असून ती लवकर पूर्ण केली जातील.

या बैठकीला पोलीस, आरोग्य, हेस्कॉम, परिवहन आदी विभागांचे अधिकारी तसेच ग्रामस्थ व उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!