
बेलगाम प्राईड/ मंगळवार, दिनांक 21 रोजी होणाऱ्या भव्य-दिव्य शिवजयंती चित्ररथ सोहळा यंदा उत्साहात व सुरळीत पार पडावा, यासाठी महापौराना निवेदन सादर करण्यात आले. प्रशासन सज्ज झाले आहे.
शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या वतीने सोमवारी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या कक्षात महापौर प्रीती कामकर व उपमहापौर हणमंत कोंगाली यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, साहित्यिक गुणवंत पाटील, प्रसाद मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. तसेच गटनेते संतोष पेडणेकर, गिरीश धोंगडी, नगरसेवक जयतीर्थ सौंदती, श्रीयेश नाकाडी आणि रमेश सोनटकी उपस्थित होते.
या बैठकीत चित्ररथ सोहळा अधिक सुव्यवस्थित आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या. त्यास महापौर, उपमहापौर व नगरसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
प्रेक्षकांना चित्ररथ व्यवस्थित पाहता यावा यासाठी गॅलरी उभारणी, ठिकठिकाणी स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या मिरवणुकीदरम्यान शिवभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून उपहारगृहे सुरू ठेवावीत, अशीही सूचना करण्यात आली.
तसेच पोलीस प्रशासन, हेस्कॉम, महानगरपालिका, वैद्यकीय सेवा आणि इतर तातडीच्या मदत यंत्रणांचा समन्वय साधण्यासाठी एकत्रित मदत कक्ष स्थापन करावा, तसेच पत्रकारांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, यावरही चर्चा झाली.
महापौर, उपमहापौर व नगरसेवकांनी या सर्व सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत स्वतःच्या सूचना मांडल्या. लवकरच चित्ररथ मिरवणूक मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या सुविधा व उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.




