खेलो इंडिया’च्या माध्यमातून हॉकी मैदान साकारणार; खास. शेट्टर
खासदार - कॅन्टोन्मेंट बोर्डाची सकारात्मक बैठक

बेलगाम प्राईड/ बेळगाव हे क्रीडा क्षेत्रातील, विशेषतः हॉकीची ‘पंढरी’ म्हणून ओळखले जाते. बेळगावच्या रक्ताने नेहमीच हॉकीचा वारसा जपला आहे. पूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हॉकीचे सामने खेळवले जात होते. हाच ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी आणि बेळगावच्या खेळाडूंना हक्काचे मैदान मिळवून देण्यासाठी ‘हॉकी बेळगाव’ संघटनेच्या वतीने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
सकल मराठा समाज व भाजपचे ज्येष्ठ नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ‘हॉकी बेळगाव’च्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ सुदाम मंचनवार यांची सरकारी विश्रामधामात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत बेळगावच्या हॉकी मैदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार जगदीश शेट्टार यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की,
केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ योजनेच्या अंतर्गत युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स मिनिस्ट्रीकडून (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय) या मैदानासाठी विशेष निधी आणि मंजुरी आणली जाईल. या प्रपोजलचा आपण स्वतः दिल्लीत वैयक्तिकरित्या पाठपुरावा करू आणि बेळगावात भव्य हॉकी मैदान तयार करून घेऊ.”
प्रशासकीय पातळीवर हालचाली
खेळाडूंच्या भावनेचा आदर करत कॅन्टोन्मेंटचे सीईओ सुदाम मंचनवार यांनी तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन दिले. मैदाना संदर्भातील हा प्रस्तताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. या बैठकीवेळी कॅन्टोन्मेंटचे कार्यकारी अभियंता सतीश मन्नोळकर हे देखील उपस्थित होते, ज्यांच्यावर या प्रस्तावाच्या तांत्रिक बाजू सांभाळण्याची जबाबदारी असेल.
किरण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘हॉकी बेळगाव’च्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. बेळगावच्या मातीतून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी खेळाडू घडावेत, या दृष्टीने हे मैदान मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला. या बैठकीला ‘हॉकी बेळगाव’चे मुख्य पदाधिकारी आणि शहरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यामध्ये
अध्यक्ष घुळाप्पा होसमणी, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर, सचीव सुधाकर चाळके, प्रकाश बेळगोजी, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, सागर पाटील, सविता वेसणे, दीपक वेसणे क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Hockey news




