
BelgaumPride -July 7, 20260
बेलगाम प्राईड/ निपाणी राष्ट्रीय महामार्ग वरील तवंदी घाटात ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने समोरून जात असलेल्या कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.
या अपघातात कोल्हापूर येथील सोयल अब्दुल रहीम मनिर (वय ३६) रा. फुलेवाडी कोल्हापूर विनोद हायबत्ती पाटील(वय 32) रा. कोरची हातकणंगला अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर जखमी झालेल्या दोघांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, घाट परिसरातून उतरत असताना ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रकने समोरून प्रवास करत असलेल्या कारला प्रचंड वेगाने धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की कारचा समोरील भागाचे नुकसान झाले आहे. कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच निपाणी पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य राबवून जखमींना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलीसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत वाहने पर्यायी मार्गाने सोडली. नंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
या प्रकरणी निपाणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.




