Uncategorized
Trending

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर राहुल गांधी यांचे आंदोलन तातडीने याना अटक

बेलगाम प्राईड दिल्ली/ दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘७, लोककल्याण मार्ग’ निवासस्थानाबाहेर अचानक ठिय्या आंदोलन सुरू केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

राहुल गांधी यांच्यासोबत वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा आणि काँग्रेसचे प्रमुख नेतेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दुपारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी थेट रस्त्यावरच ठिय्या मांडला. या वेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.

युवांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांनी राजीनामा द्यावा

या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकारवर तीव्र निशाणा साधला. “काल तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष कारवाईचे उत्तर मागण्यासाठी आम्ही पंतप्रधानांच्या घरापर्यंत आलो आहोत. देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे,” असे राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले.

पंतप्रधानांचे निवासस्थान हा सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील परिसर मानला जातो. त्यामुळे घटनास्थळी दाखल झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काँग्रेस नेत्यांना आंदोलन मागे घेण्याची आणि तेथून हटण्याची विनंती करण्यास सुरुवात केली आहे.

रुग्णालयात जाऊन जखमींची घेतली भेट

पंतप्रधान निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू करण्यापूर्वी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली होती. सोमवारी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईत जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची आणि विद्यार्थ्यांची त्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

नीट परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजेपी समर्थकांनी सोमवारी संसदेवर धडक मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान पोलिसांनी केलेल्या बळप्रयोगाचे पडसाद आता राजकारणात उमटू लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!