Uncategorized
Trending

संकेश्वरमध्ये चक्रवाढ व्याजाने कर्जवसुली करणारा आरोपी अटक

दि. २२ जुलै 2026

बेलगाम प्राईड/ व्याजाने पैसे देऊन चक्रवाढ व्याजाने कर्ज बेकायदेशीर वसुली व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका आरोपीला संकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. 

या संदर्भात करजगा (ता. हुक्केरी) येथील श्रीमती स्नेहा विकास मेळगेरी यांनी २० जुलै २०२६ रोजी संकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, त्यांचे पती विकास मेळगेरी यांनी २०२२ ते २०२६ या कालावधीत संकेश्वर येथील भीमनगरमधील सदानंद भीमराव हळगे (वय ४७) याच्याकडून खासगी व्याजाने कर्ज घेतले होते.

कर्ज देताना आरोपीने तक्रारदारांकडून चार कोरे धनादेश (चेक) आणि जास्त रकमेचा उल्लेख असलेले बाँड लिहून घेतले होते. त्यानंतर त्याने तीन धनादेश परत दिले. तक्रारदार दाम्पत्याने मूळ कर्ज व वाढीव व्याजासह एकूण ₹३६,७७,६०७ इतकी रक्कम फोनपे व आरटीजीएसद्वारे परतफेड केली. तरीही आरोपीने आणखी ₹४,६४,००० अतिरिक्त व्याजाची मागणी करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी संकेश्वर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम ३५२, ३५१(२) तसेच कर्नाटक मायक्रो अँड स्मॉल लोन (प्रिव्हेन्शन ऑफ कोअर्सिव्ह ॲक्शन्स) अधिनियम, २०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

पोलीस अधीक्षक के. रामराजन (IPS), अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी आणि गोकाक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवी डी. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संकेश्वर पोलिस निरीक्षक जी. बी. कोंगनोळी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने आरोपीचा शोध घेतला.

२२ जुलै २०२६ रोजी आरोपी सदानंद भीमराव हळगे हा कणगला गावातून इतरत्र पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

या कारवाईत पीआय जी. बी. कोंगनोळी, पीएसआय व्ही. आय. नाईक, पीएसआय यू. एस. शेट्टेण्णवर, एएसआय एल. एस. खोत तसेच पोलीस कर्मचारी बी. के. नागनुरी, एस. एल. गळतगी, व्ही. बी. मुर्कीभावी, एस. एम. यक्षंबी, व्ही. जी. कुड्डगोळ आणि तांत्रिक शाखेतील विनोद ठक्कण्णवर व सचिन पाटील यांनी सहभाग घेतला. त्यांच्या कामगिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!