Uncategorized
Trending

मराठा एलआयआरसीमध्ये भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन

लेझीम, झांज-पथक व मराठमोळ्या लोकनृत्यांनी विसर्जन मिरवणुकीत रंगत

बेलगाम प्राईड/ द मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे भक्ती, भावने उत्साह आणि मराठमोळ्या सांस्कृतिक परंपरेच्या वातावरणात श्री गणेश विसर्जन सोहळा पार पडला. अर्गन तलाव येथे विधीवत श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

गणेश चतुर्थीच्या दिवशी ऐतिहासिक मिलिटरी महादेव मंदिरात श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. रेजिमेंटल परिवाराच्या वतीने श्री गणरायाचे भक्तिभावाने पूजन करून आशीर्वाद घेण्यात आले. त्यानंतर आज मिलिटरी महादेव मंदिरापासून अर्गन तलावापर्यंत श्री गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत पारंपरिक लेझीम, झांज-पथक तसेच विविध मराठमोळ्या लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरासह पारंपरिक वाद्यांच्या तालावर सहभागी झालेल्या जवान आणि नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला. त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय तसेच सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, SM, VSM, कमांडंट, द मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन सोहळा पार पडला. अधिकारी, ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स (JCOs), जवान, अग्निवीर, नागरी कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच कॅन्टोन्मेंट व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.

अर्गन तलाव येथे श्री गणरायाची अंतिम आरती करण्यात आली. त्यानंतर विधीवत श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. सोहळ्याच्या समारोपानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.श्रद्धा, एकता, बंधुभाव आणि मराठमोळ्या सांस्कृतिक वारशाचा संदेश देत हा गणेश विसर्जन सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!