सीबीएसई राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आरोही आणि निधीची चमकदार कामगिरी; बेळगावच्या शिरपेचात मानाचे पाच पदक
आरोही चित्रगारची दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई; निधी कुलकर्णीला कांस्यपदक
बेलगाम प्राईड/ नुकत्याच पार पडलेल्या सीबीएसई राष्ट्रीय जलतरण स्पर्धा २०२६ मध्ये बेळगावच्या दोन युवा जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत शहराच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविला आहे. आरोही चित्रगार आणि निधी कुलकर्णी यांनी या स्पर्धेत एकूण पाच पदकांची कमाई करून बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
२५ ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या सीबीएसई राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत आरोही चित्रगार आणि निधी कुलकर्णी यांनी स्विमर्स क्लब बेळगाव आणि अॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावचे प्रतिनिधित्व केले. देशभरातील विविध शाळांमधील प्रतिभावान जलतरणपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांच्याशी स्पर्धा करत बेळगावच्या या दोन्ही खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत आरोही चित्रगार हिने दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण चार पदके पटकावली, तर निधी कुलकर्णी हिने एक कांस्यपदक मिळविले. दोघींनी मिळून एकूण पाच पदकांची कमाई करत बेळगावचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले.
या दोन्ही जलतरणपटू सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात (ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव) नियमित सराव करीत आहेत. उमेश कघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जलतरण प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर आणि विनायक अंबेवाडीकर यांच्या प्रशिक्षणाखाली त्या कठोर मेहनत घेत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण सरावातून आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणातून हे यश साकार झाले आहे.
या खेळाडूंच्या यशामागे अनेक मान्यवरांचे प्रोत्साहन आणि सहकार्य लाभले आहे. केएएचईआरचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, रोटेरियन अविनाश पोतदार, मानेक कापडिया, लता कित्तूर, सुधीर कुसणे, प्रसाद तेंडोलकर तसेच अन्य हितचिंतकांनी वेळोवेळी त्यांना प्रोत्साहन व पाठबळ दिले आहे.
आरोही आणि निधी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर, जलतरणप्रेमी आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे बेळगावच्या समृद्ध क्रीडा परंपरेत आणखी एका मानाच्या यशाची भर पडली आहे.




