Uncategorized
Trending

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने..- महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या ग्रंथालयाचा शुभारंभ

बेलगाम प्राईड/ युवा समितीच्या वतीने आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई’ यांच्या सहकार्याने युवा समितीच्या टिळकवाडी येथील कार्यालयात ग्रंथालयाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व विविध ज्ञानग्रंथांचे पूजन करून झाली. त्यानंतर उपस्थित बालचमू तसेच कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, खजिनदार विनायक कावळे, सुरज कुडूचकर, साईनाथ शिरोडकर, प्रतीक पाटील, आकाश भेकणे, प्रवीण रेडेकर, विनायक मोरे, महेश जाधव, महेश जायनाचे, आनंद पाटील, विकास भेकणे आदी मान्यवर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ग्रंथालयाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

या ग्रंथालयात प्रामुख्याने *संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास व संदर्भ ग्रंथ, समृद्ध मराठी वाङ्मय, विविध थोर व्यक्तींची चरित्रे, प्रेरणादायी पुस्तके, कादंबऱ्या आणि कविता संग्रह* उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यावेळी सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आजच्या डिजिटल युगात तरुणांमध्ये पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी, वाचन संस्कृती रुजावी व वाढीस लागावी यासाठी या ग्रंथालयाची संकल्पना मांडण्यात आली आहे. सीमाभागात मराठी वाचन संस्कृती अधिक सक्षम व्हावी, सीमाप्रश्न आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास व्हावा म्हणून हे ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे.”

बेळगावसह सीमाभागात मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी वाचन, शिक्षण आणि ज्ञानाच्या माध्यमातून मराठी अस्मिता अधिक बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तकांचा संग्रह नसून, मराठी भाषा, विचार आणि संस्कार यांची पुढच्या पिढीशी नाळ जोडणारे एक व्यासपीठ ठरेल, असा विश्वास युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी व्यक्त केला.

‘सहकार्य समाजाचे, कर्तव्य युवा समितीचे’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या मराठी भाषा संवर्धनाच्या वाटचालीतील हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

मराठीप्रेमी नागरिक, विद्यार्थी आणि वाचनप्रेमींनी या विधायक उपक्रमाला सहकार्य करावे आणि या वाचनालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांचे विशेष आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!