बेळगाव ग्रामीण पोलिसांकडून घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक; २६.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त
सहा घरफोड्यांची कबुली; १६१ ग्रॅम सोने, एक किलो चांदी आणि गुन्ह्यात वापरलेली स्कूटी हस्तगत

बेलगाम प्राईड/ बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण २६ लाख ५३ हजार ४०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपीने पीरनवाडी, हुंच्यानट्टी आणि मच्छे परिसरातील एकूण सहा घरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
२ ऑक्टोबर २०२६ रोजी हुंच्यानट्टी येथील स्वामी विवेकानंद नगरातील रहिवासी लक्ष्मी सिद्राम रामण्णवर यांनी आपल्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक २१८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) आणि ३०५(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनिगौडर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. या तपासादरम्यान रोहन रूपेश पाटील (वय ३०, मूळ रा. क्रांतीनगर, गणेशपूर; सध्या रा. श्रीहरी अपार्टमेंट, दुसरे रेल्वे गेट, टिळकवाडी, बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले.
दिवसा फिरून घरांचा अंदाज घेऊन रात्रीच्या वेळी घरफोड्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची चौकशी केली असता तो दिवसा स्कूटीवरून परिसरात फिरत असे आणि पीरनवाडी, हुंच्यानट्टी व मच्छे येथील सहा घरांमध्ये चोरी केल्याचे त्याने कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने व साधने जप्त केली.
२६.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील पुढीलप्रमाणे :

१. सोन्याचे दागिने : १६१ ग्रॅम वजनाचे, किंमत २३ लाख ८८ हजार ४०० रुपये.
२. चांदीच्या वस्तू : एक किलो वजनाच्या, किंमत २ लाख ३० हजार रुपये.
३. स्कूटी मोटारसायकल : गुन्ह्यात वापरलेले वाहन, क्रमांक केए-२२/ईयू-२१६०, किंमत ३५ हजार रुपये.
४. घरफोडीसाठी वापरलेली साधने : लोखंडी छिन्नी, कटर, स्क्रूड्रायव्हर आणि पाना.
या कारवाईत एकूण २६ लाख ५३ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या पथकाचे कौतुक
या प्रकरणाचा छडा लावून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनिगौडर, पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई, लक्ष्मप्पा जोडट्टी आणि वाय. डी. सरनाईक यांच्यासह पोलीस कर्मचारी सतीश नायकवाड, श्रीकांत उप्पार, मारुती कोटबागी, बाळेश पडनाड, आनंद कोटगी, शिवानंद वर्चगल्ल तसेच तांत्रिक विभागातील रमेश अक्की, महादेव काशिद आणि दीपक दोड्डगोणी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या पथकाच्या कामगिरीचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी कौतुक केले आहे. प्रकरणी आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.




