Uncategorized
Trending

झाडशहापूर अपघात प्रकरणी टेम्पो चालकासह मालकाची निर्दोष मुक्तता

बेलगाम प्राईड/ झाडशहापूर (ता. बेळगाव) येथील दर्ग्याजवळ 2019 मध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातप्रकरणी टेम्पो चालकासह टेम्पो मालकाची बेळगाव येथील द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. साक्षीदारांच्या जबाबांमध्ये आढळलेल्या विसंगतींच्या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणातील आरोपी टेम्पो चालक परशराम उमाजी पाखरे (वय 30, रा. इदलहोंड, ता. खानापूर) आणि टेम्पो मालक रामा पुंडलिक गुरव (वय 40, रा. सिंगिनकोप, पोस्ट इदलहोंड, ता. खानापूर) अशी नावे आहेत. आरोपींच्यावतीने ॲड.मारुती कामानाचे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

फिर्यादी संदीप ज्योतिबा नाईक (रा. पोटे गल्ली, देसूर, ता. बेळगाव) यांनी बेळगाव ग्रामीण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, 30 डिसेंबर 2019 रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा लहान भाऊ सचिन ज्योतिबा नाईक (वय 31) हा मोटारसायकल क्रमांक KA-22-ET-4277 वरून देसूरहून बेळगावच्या दिशेने आपल्या बाजूने जात होता.

तो झाडशहापूरजवळील दर्ग्याजवळ आला असता, बेळगावहून खानापूरच्या दिशेने जाणाऱ्या 407 टेम्पो क्रमांक KL-40-8244 च्या चालकाने वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविताना ताबा गमावला. टेम्पो रस्त्याच्या चुकीच्या बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या सचिन नाईक यांच्या मोटारसायकलला जोरदार धडकला.

या अपघातात सचिन नाईक गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा त्याच दिवशी सायंकाळी सुमारे पाच वाजता मृत्यू झाला.

अपघातानंतर टेम्पो चालकाने घटनेची माहिती पोलिसांना न देता अपघातस्थळीच टेम्पो सोडून तेथून पळ काढल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता.या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध भादंवि कलम 279, 304(अ) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम 134 व 187 अन्वये गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान टेम्पो चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मुदतबाह्य असल्याचे तसेच टेम्पोचा विमाही (इन्शुरन्स) संपलेला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

मुदतबाह्य परवान्याने व विमा नसलेल्या वाहनाचा वापर केल्याप्रकरणी टेम्पो मालकाविरुद्धही मोटार वाहन कायद्यातील कलम 5, 180, 146 व 196 अन्वये आरोप ठेवण्यात आले. पोलिसांनी तपास पूर्ण करून दोन्ही आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

मात्र, न्यायालयीन सुनावणीदरम्यान साक्षीदारांच्या जबाबांमध्ये आढळलेल्या विसंगती तसेच अभियोजन पक्षाकडून आरोप सिद्ध करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचा विचार केल्यानंतर बेळगाव येथील द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने परशराम पाखरे आणि रामा गुरव या दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ॲड. मारुती कामानाचे यांनी युक्तिवाद केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!