
बेलगाम प्राईड/ राष्ट्रीय महामार्गाजवळ गांधीनगर परिसरात गुरुवारी काचेचा लेप असलेल्या पतंगाच्या मांजाच्या धाग्यात अडकून दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात बंदी असलेल्या मांजाची विक्री आणि वापर अद्याप सुरू असल्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ध्रुव के. (वय १९), रा. महांतेशनगर, बेळगाव अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. ध्रुव दुचाकीवरून जात असताना मांजाचा धागा त्याच्या अंगाला अडकला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, बंदी असलेल्या काचेच्या मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पतंग उडविताना वापरला जाणारा मांजा दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांसाठी गंभीर धोकाचा ठरत असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शहरात बंदी असलेल्या मांजाची विक्री व वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




