भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून स्थानिक हस्तकला उत्पादनांना जागतिक बाजारपेठेची संधी : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

बेलगाम प्राईड/ भारतीय टपाल विभाग आणि हस्तकला उत्पादन निर्यात प्रोत्साहन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक भारतीय हस्तकला उत्पादनांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा शोध आणि भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून निर्यात या विषयावर जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा वाणिज्य व उद्योग संघटनेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बेळगाव विभागाच्या वरिष्ठ टपाल अधीक्षक आरुषी शर्मा, हस्तकला उत्पादन निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या दक्षिण प्रादेशिक कार्यालयाच्या प्रमुख पी. एल. श्रीदेवी, बेळगाव वाणिज्य व उद्योग संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील शहा, जिल्हा उद्योग केंद्राचे संयुक्त संचालक सत्यनारायण भट, धारवाड प्रादेशिक टपाल कार्यालयाचे संचालक आर. वाय. मधुसागर, टपाल समितीचे अध्यक्ष रोहित कपाडिया, टपाल निरीक्षक रूपेश कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, बेळगावचे सौंदर्य, स्थानिक हस्तकला आणि औद्योगिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी टपाल विभागाचे ‘डाक घर निर्यात केंद्र’ महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
पूर्वी केवळ पत्रव्यवहार आणि टपाल वितरणापुरती मर्यादित असलेली टपाल सेवा आता स्थानिक उत्पादकांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. जगातील २०० हून अधिक देशांमध्ये कमी खर्चात वस्तू पोहोचविण्याची सुविधा, सुलभ कागदपत्रांची प्रक्रिया आणि सोप्या ई-कॉमर्स सेवा यामुळे स्थानिक उद्योजकांना मोठा लाभ होणार आहे. स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बेळगाव विभागाच्या वरिष्ठ टपाल अधीक्षक आरुषी शर्मा म्हणाल्या की, सुमारे १७० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेला भारतीय टपाल विभाग काळानुरूप आपल्या सेवांमध्ये बदल करून नागरिकांना विविध सुविधा पुरवत आहे. सध्या टपाल विभागाच्या कार्यक्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून, स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सहजपणे पोहोचविण्यात विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
या उपक्रमामुळे बेळगाव परिसरातील पारंपरिक हस्तकला उत्पादक, लघुउद्योजक आणि स्थानिक व्यावसायिकांना आपली उत्पादने परदेशात निर्यात करण्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे.




