Uncategorized
Trending

हनुमान चालीसा पठणातून दिव्य शक्तीची प्राप्ती : के. गोवर्धनराव

कार्यसिद्धी आंजनेयस्वामी मंदिरात दीपावलीनिमित्त हनुमान चालीसा पठण व आरती सेवा कार्यक्रम

बेलगाम प्राईड/ भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती असून, आज संपूर्ण जग तिचे अनुकरण करीत आहे. आपल्या भूमीतील संत, महात्मे, तत्त्वज्ञ, त्यागी, योगी आणि तपस्वी यांच्या महान तपश्चर्येमुळे भारतीय संस्कृतीला समृद्ध परंपरा लाभली आहे. प्रभू श्रीरामाचे भक्त हनुमंत यांच्या नित्य स्मरण आणि हनुमान चालीसा पठणामुळे जीवन पवित्र व सार्थकी लागते, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे उत्तर कर्नाटक प्रांत उपाध्यक्ष के. गोवर्धनराव यांनी केले.

दीपावलीनिमित्त बेळगावच्या रामतीर्थनगर येथील प्रसिद्ध श्री कार्यसिद्धी आंजनेयस्वामी मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि आरती सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून त्यांनी स्वामींची आरती केली आणि भक्तांना मार्गदर्शन केले.

भारतीय संस्कृतीच्या समृद्धीचे प्रतीक असलेली देशातील जगप्रसिद्ध मंदिरे, मठ आणि प्रार्थनास्थळे आजही जगभरातील लोकांना आकर्षित करीत आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. प्रत्येकाने हनुमंताप्रमाणे उत्तम संस्कार आत्मसात करून आपले जीवन सार्थकी लावावे. प्रत्येकाच्या मनात आपली मातृभूमी आणि मातृभाषेबद्दल अभिमान असला पाहिजे. तसेच मुलांमध्ये भक्तीभाव आणि संस्कार रुजविण्यासाठी मंदिरांच्या माध्यमातून प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मंदिर व्यवस्थापन मंडळाने केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी आभार मानले.

याप्रसंगी रामतीर्थनगर येथील दानशूर भक्त दत्तात्रय गणपती भट आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मंदिराच्या विकासासाठी १० हजार १ रुपयांची देणगी दिल्याबद्दल त्यांचा व्यासपीठावर सत्कार करण्यात आला.भाजपचे नेते मदनकुमार भैरप्पा यांची यावेळी उपस्थिती होती. विश्व हिंदू परिषदेचे बेळगाव महानगर अध्यक्ष आनंद करलिंगण्णावर यांनी प्रास्ताविकात परिषदेच्या विविध कार्यांची माहिती दिली.

मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष एस. जी. कल्याणी यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थान भूषविले. सचिव मंजुनाथ पाटील यांनी स्वागत करून समितीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाला समितीचे शिवानंद मठपती, एन. बी. हण्णिकेरी, सी. एस. खनगण्णी, बसवराज हिरेमठ, एस. एल. सनदी, संतोष सनदी, गुरुसंगप्पा चेलगेरी, जे. जी. हुन्नूर, मंदिराचे पुजारी प्रकाश दीक्षित, मल्हार दीक्षित यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे सदस्य, महिला आणि बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.ए.के.पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!