
बेलगाम प्राईड/ पॅशनेट स्पोर्ट्स अकॅडमी (पीएसए) येथील बालजलतरणपटूंनी पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप पाडली आहे. मजबूत पायाभूत प्रशिक्षणामुळे मोठी यशे मिळू शकतात, हे या चिमुकल्यांनी सिद्ध करून दाखवले.
बेळगाव येथील गॅलेक्सी स्विमिंग पूलमध्ये २०१९, २०२०, २०२१ आणि २०२२ या कालावधीत झालेल्या स्पर्धांमध्ये पीएसएच्या विविध वयोगटातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी झालेल्या चारही बालजलतरणपटूंनी सुवर्ण व रौप्य पदके पटकावत अकॅडमीचा लौकिक वाढवला.
अवीश चौगुले, यश पाटुकले, निराली हिंगमिरे आणि सान्वी देसाई या चिमुकल्यांनी आत्मविश्वास, कौशल्य आणि निर्भय वृत्तीच्या जोरावर ही कामगिरी साध्य केली. इतक्या लहान वयात त्यांनी मिळवलेले यश प्रेरणादायी ठरत आहे. पीएसएमध्ये मूलभूत कौशल्यांवर भर देत लहानपणापासूनच खेळाडू घडवण्यावर विशेष लक्ष दिले जाते. ‘चॅम्पियन हरू शकतो, पण कधीही पराभूत होत नाही,’ या ब्रीदवाक्याप्रमाणे अकॅडमी ‘पदकांपलीकडे चॅम्पियन घडवणे’ या ध्येयाने कार्यरत आहे.




