
बेलगाम प्राईड/ बेळगावच्या विकासासाठी तातडीने मार्गी लावण्याची गरज असलेल्या ७ गंभीर विषयांची ओळख करून घेतलेल्या एफओएबीने (फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ बेळगाव) या विषयांवर जिल्ह्याचे मंत्री, आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत थेट चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी सायंकाळी फाउंड्री क्लस्टर सभागृहात झालेल्या बैठकीत एफओएबी अंतर्गत असलेल्या २० हून अधिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सुमारे दोन तास सविस्तर चर्चा केली. शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रेल्वे उड्डाणपूल प्रकल्प, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीची रिंग रोड योजना, हातातून निसटण्याच्या स्थितीत असलेली स्मार्ट सिटीज २ योजना, दुर्लक्षित सीडीपी आणि एसटीपी योजना, तातडीने उन्नतीकरणाची गरज असलेली हेस्कॉम वीज केंद्रे, तसेच गेल गॅस पाइपलाइन, बायोगॅस आणि गोबरधन योजना या विषयांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आले.
शहरात आधीच उभारण्यात आलेल्या अवैज्ञानिक रेल्वे उड्डाणपूलांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तसेच भविष्यात उभारण्यात येणाऱ्या आणखी उड्डाणपूलांमुळे शहराच्या विकासावर होणाऱ्या विपरीत परिणामांवर बैठकीत सखोल चर्चा झाली. रस्त्यांवर उड्डाणपूल उभारण्याऐवजी रेल्वे ट्रॅकसाठी उंच मार्ग (एलिव्हेटेड रेल्वे ट्रॅक) विकसित केल्यास शहराच्या विकासाला मोठी गती मिळू शकते, असे तज्ज्ञांनी देशातील अनेक यशस्वी शहरांची उदाहरणे देत स्पष्ट केले. यामुळे शहराचे सौंदर्य वाढेल, वारसा स्थळांचे संरक्षण होईल आणि अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीज २ योजनेसाठी बेळगावची निवड झाली असतानाही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही योजना हातातून जाण्याच्या स्थितीत असल्याचे स्पष्ट माहितींसह मांडण्यात आले. ही बाब शहराच्या विकासासाठी मोठा धक्का ठरू शकते, असे मत व्यक्त करण्यात आले.
फक्त दोन गावांतील जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे रिंग रोड प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला असून त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी गंभीर बनली असल्याची चर्चा झाली.
शहराच्या वाढीसोबत बदल होणे अपेक्षित असलेली सिटी डेव्हलपमेंट प्लॅन (सीडीपी) योजना दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे नियोजनबद्ध विकासाला अडथळा निर्माण होत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. तसेच प्रत्येक प्रभागासाठी आवश्यक असलेल्या एसटीपी प्रकल्पांपैकी शहरात एकही प्रकल्प अस्तित्वात नसल्याची बाबही चिंतेची असल्याचे सांगण्यात आले. वाढत्या शहरासाठी ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते, त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
शहरातील सर्व वीज केंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण असल्याचे सांगण्यात आले. तातडीने ४०० केव्ही स्टेशन आणि अनेक नवीन सबस्टेशन्स उभारले नाहीत, तर पुढील एका वर्षात शहराला मोठ्या वीज समस्येला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा देण्यात आला.
याशिवाय, हलगा–मच्छे बायपास आणि येडियुरप्पा मार्गाला जोडणारा महात्मा फुले रस्ता वाहतुकीसाठी खुला न करता नर येथे फ्लायओव्हरचे काम सुरू झाल्यास शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते, अशी चिंताही बैठकीत व्यक्त करण्यात आली.
लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत पहिल्या टप्प्यात चर्चा करून त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री, इतर मंत्री आणि बेळगाव शहरातील आमदारांसोबत बैठक घेऊन या विषयांकडे त्यांचे लक्ष वेधण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले वरिष्ठ उद्योजक आणि फाउंड्री क्लस्टरचे अध्यक्ष राम भंडारे म्हणाले की, बेळगावच्या विकासासाठी एफओएबीचे हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आणि आवश्यक आहे. पुढील काळात सर्व संघटना, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
एफओएबीचे संयोजक चैत्यन्य कुलकर्णी यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. दुसरे संयोजक एम. के. हेगडे यांनी पुढील योजनांची माहिती देऊन आभार मानले.
यावेळी वाणिज्य उद्योग संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर नागरमुनोळी, प्रोफेशनल फोरमचे डॉ. एच. बी. राजशेखर आणि बी. जी. धरेण्णी, लघुउद्योग भारतीचे सचिन सबनीस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचे सी. बी. हिरेमठ, क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी आणि सदस्य आनंद कुलकर्णी, फाउंड्री क्लस्टरचे सचिव सदानंद हुंबरवाडी आणि सदस्य विजय मुच्छंडीकर, एफओएबी समन्वयक राजेंद्र मुंदड, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे एस. एस. गडियाण्णवर तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी प्रसन्न कोचरी, एस. बी. दंडगी, अमित कालकुंद्री, अनिल रामदुर्ग आदी उपस्थित होते.




