
बेलगाम प्राईड / रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने टाटा आयपीएल-2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून या पार्श्वभूमीवर 31 मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यानंतर शहरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना आणि निर्बंध जाहीर केले आहेत.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, सामन्याचा निकाल लागल्यानंतर कोणत्याही प्रकारचे शहर परिसरात सार्वजनिक ठिकाणी जल्लोष, मिरवणुका किंवा आनंद उत्सव साजरे करण्यास परवानगी नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
रस्त्याकडे तोंड करून एलईडी स्क्रीन किंवा वॉल उभारण्यासाठी संबंधित महानगरपालिका किंवा स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी आवश्यक असून आधीपासून बसवलेल्या बाह्य एलईडी स्क्रीनवर सामना प्रक्षेपित करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
तसेच फटाके फोडणे, धोकादायक साहित्याचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी गोंधळ घालणे, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणे, दुचाकी रॅली काढणे, वेगाने वाहन चालवणे, स्टंटबाजी करणे, विनाकारण हॉर्न वाजवणे किंवा रस्ते अडवणे यावर कठोर बंदी घालण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, दंगल, भांडणे किंवा असभ्य वर्तन करणे तसेच सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट, द्वेषपूर्ण संदेश किंवा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. विरोधी संघाच्या चाहत्यांना चिथावणी देणे किंवा त्यांच्याशी वाद घालणे टाळण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
शहरभर मद्यधुंद वाहनचालकां विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून 15 अल्कोमीटरच्या साहाय्याने तपासणी केली जाणार आहे. तसेच प्राणघातक शस्त्रे बाळगणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘अँटी-स्टॅबिंग स्क्वॉड’ कार्यरत राहणार असून, कारवाई दरम्यान पोलीस कर्मचारी बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांचा वापर करणार आहेत.
पत्रकात नमूद केल्याप्रमाणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार प्रथम गुन्ह्यासाठी 10 हजार रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांपर्यंत कारावास, तर पुनरावृत्ती झाल्यास 15 हजार रुपयांचा दंड, दोन वर्षांपर्यंत कारावास आणि वाहन परवान्याचे कायमस्वरूपी रद्दीकरण करण्यात येऊ शकते.
कायदा-सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता आणि नागरिकांची सुरक्षितता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद करत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.




