
BelgaumPride -July 20, 2026
बेलगाम प्राईड/ कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या (आंबेडकरवाद) वतीने बेळगावचे उपविभागीय अधिकारी (सहाय्यक आयुक्त) श्रवण नायक यांच्या विरुद्ध दलितविरोधी आणि एकतर्फी कारभाराचा निषेध करत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले.
दलीत समितीचे राज्य खजिनदार सिद्धप्पा कांबळे आणि जिल्हा संयोजक महांतेश तळवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात सहाय्यक आयुक्तांनी न्यायालयीन प्रकरणांमध्ये प्रतिवाद्यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा नोटीस न देता सदाशिव नगर, शाहू नगर आणि हलगा येथील जमिनींचे आदेश एकतर्फी दिले आहेत. कोर्टाचे वारसा प्रमाणपत्र असतानाही ते रद्द करण्याचे बेकायदेशीर कृत्य अधिकाऱ्याने केल्याचा आरोप केला आहे.

तसेच, खानापूर येथील सर्व्हे नंबर ९३/ए१ मधील १४ एकर जमिनीवर अनेक वर्षांपासून राहणाऱ्या डोंबारी समाजाच्या दलितांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवून, उलट त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
दलित नेत्यांनी यावर जाब विचारला असता अधिकाऱ्याने जातीवाचक शिवीगाळ करत पदाचा अहंकार दाखवल्याचे समितीने सांगितले. या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्तांच्या पुतळा करून मिरवणूक काढली तसेच त्या पुतळ्याला चप्पलने मारबडव करून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतला. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.




