Uncategorized
Trending

बेळगावच्या बेपत्ता विद्यार्थ्यांची गोवा वनखात्याकडून सुटका

प्रवेशबंदी असलेल्या जळवणे धबधबा परिसरात बेकायदा प्रवेशप्रकरणी गुन्हा दाखल

बेलगाम प्राईड/ म्हादई वन्यजीव अभयारण्य परिसरात असलेल्या प्रतिबंधित सूरल येथील जळवणे धबधबा परिसरात अनधिकृत प्रवेश केल्यामुळे गोवा वनविभागाने बेळगावच्या पाच विद्यार्थ्यां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. १४ जुलै रोजी या विद्यार्थ्यांनी वनविभागाकडून परवानगी न घेता कणकुंबी पारवाड मार्गाने अभयारण्यात प्रवेश केला होता. त्यांचा जळवणे धबधब्याला भेट देण्याचा उद्देश होता, परंतु जालवानी नदीच्या काठावर पोहोचल्यानंतर पाण्याची वाढलेली पातळी आणि जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. परत येताना ते जंगलामध्ये रस्ता चुकले.

वन विभागाला वन हेल्पलाइन क्रमांक १९२६ वरून बेपत्ता विद्यार्थ्यांची माहिती मिळाली. त्यानंतर वनविभागाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. वन कर्मचाऱ्यांनी रात्री सुमारे १०:३० वाजता पारवाड शिकारविरोधी छावणीच्या हद्दीतून पाचही विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या शोधून त्यांची सुटका केली. चौकशी दरम्यान विद्यार्थ्यांनी सांगितले की, धबधबा खुला असल्याच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून त्यांनी त्या परिसराला भेट दिली होती.

विद्यार्थ्यांनी अधिकृत परवानगी न घेता वनसंरक्षित क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ च्या संबंधित तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गोवा वनविभागाने स्पष्टीकरण दिले आहे की जळवणे धबधबा हा म्हादई वन्यजीव अभयारण्याच्या गाभा क्षेत्रामधील एक प्रतिबंधित व उच्च-जोखमीचा परिसर आहे. जनतेला दिशाभूल करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट किंवा अपुऱ्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचा आणि केवळ वनविभागाने अधिकृतपणे परवानगी दिलेल्या स्थळांनाच भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

संरक्षित क्षेत्रात अनधिकृत प्रवेश करणे हा एक शिक्षापात्र गुन्हा आहे. सदर जळवणे धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी गोवा सरकारने पूर्णपणे बंदी घातली आहे. याची बेळगाव व परिसरातील युवकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन गोवा वनखात्याच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!