
06-07-2026
बेलगाम प्राईड/ बेळगावच्या कॅम्प परिसरातील महिला पोलीस ठाण्यासमोर दोन वृद्ध सख्ख्या बहिणींची जगण्यासाठीची केविलवाणी धडपड सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसात आणि थंडीत या दोघी उघड्यावरच दिवस रात्र काढत आहेत.
कॅम्प परिसरात एका रस्त्याकडेला प्लास्टिकच्या ताडपत्रीचा आधार घेत तात्पुरता शेड उभारून या अगतिक वृद्ध महिला राहत आहेत. सततच्या पावसामुळे या शेडला आधार असलेली मातीची भिंत पूर्णपणे भिजली असून ती कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
या वृद्ध भगिनींच्या दुरवस्थेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.या दोघींच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेकडे आधीच मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
प्रशासनाच्या या उदासीनतेबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित अधिकारी किंवा सामाजिक संस्थांनी यांना तातडीने सुरक्षित निवारा द्यावा अशी मागणी होत आहे.




