
बेलगाम प्राईड क्रीडा/ बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुतगा गावचा प्रतिभावान पॅरा जलतरणपटू स्वातीक पाटील याने जपानमधील आयची-नागोया येथे आयोजित २०२६ आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक पटकावत भारताचा गौरव वाढवला आहे. पुरुषांच्या १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक एसबी-९ प्रकारात स्वातीकने ही उल्लेखनीय कामगिरी केली.
अंतिम फेरीत स्वातीकने एक मिनिट १३.७७ सेकंदांत शर्यत पूर्ण करत तिसरे स्थान मिळवले. इराणच्या सिना झेघामिनेजाद यांनी १ मिनिट ९.४७ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले, तर त्याच देशाच्या शाहिन इझाद्यार यांनी १ मिनिट १३.२३ सेकंदांत शर्यत पूर्ण करत रौप्यपदक मिळवले.

मुतग्यापासून आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेपर्यंतचा प्रवास
स्वातीक हा नारायण पाटील आणि चांगुणा पाटील यांचा मुलगा आहे. एनआयटी अलाहाबाद येथून शिक्षण पूर्ण केलेला स्वातीक सध्या झॉपिंग कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहे. व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच त्याने जलतरणातील सराव आणि स्पर्धात्मक कारकीर्द कायम ठेवली आहे.
स्वातीकच्या यशामागे कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि खेळाप्रती असलेली निष्ठा आहे. दररोज सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास असे एकूण सहा तास तो सराव करतो. बेळगाव येथील सुवर्ण जेएनएमसी कॅम्पसमधील ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलावात तसेच बंगळुरू येथील नेट्टाकल्लप्पा स्विमिंग सेंटरमध्ये त्याचे प्रशिक्षण सुरू असते.
प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वातीकच्या जलतरण कारकिर्दीला मार्गदर्शक उमेश कलघटगी यांच्यासह प्रशिक्षक शरत चंद्र, अंकुश कनबरकर, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर आणि गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
नोकरी आणि खेळ यांचा समतोल राखत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या स्वातीकने आपल्या जिद्दीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे बेळगाव जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली असून, मुतगा गावासह संपूर्ण परिसरातून त्याचे अभिनंदन होत आहे.
स्वातीक पाटीलच्या या यशाने बेळगावच्या क्रीडा प्रतिभेची आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा दखल घेतली गेली आहे.




