उपलोकायुक्त बी. वीरप्पा यांनी बुडा, स्मार्ट सिटी कामांचा अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश

बेलगाम प्राईड/ उप लोकायुक्त न्या. बी. वीरप्पा यांनी गुरुवार (दि. २९) रोजी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या (बुडा) कार्यालयाला आणि स्मार्ट सिटी कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली.
शहर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांनी कर्मचाऱ्यांची हजेरी, रोख वह्या, हालचाल वह्यांची माहिती घेऊन तपासणी केली. प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात आलेल्या नवीन लेआउट्समध्ये रस्ते, वीज जोडणी, गटार व्यवस्था केली आहे की नाही याची माहिती घेऊन त्याची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.
प्राधिकरणाकडून लीजवर देण्यात आलेल्या सी.ए. साइट्सच्या माहितीसह विविध फायलींची त्यांनी तपासणी केली.त्यानंतर स्मार्ट सिटी कार्यालयाला भेट दिलेल्या त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची हजेरी, हालचाल वह्यांची माहिती तपासली. कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याने रोख वह्यांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी नोंद करावी असे सांगितले.
स्मार्ट सिटीच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या विकास कामांची माहिती घेत त्यांनी आपल्याच कार्यालयाचा रस्ता आणि आवार दुरुस्त करून घेण्याचा सल्ला दिला.
यावेळी उपनिबंधक अरविंद, लोकायुक्त एस.पी. प्रसन्न देसाई, जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव के.एन. शिवकुमार, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा पंचायत योजना संचालक रवि बंगारप्पनवर, महापालिका आयुक्त एम. कार्तिक, बुडा आयुक्त यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

