ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ईरन्ना कडाडी यांचे निवेदन
एफआरपीचा फेरआढावा, एमएसपीमध्ये वाढ आणि उपपदार्थांच्या नफ्यात शेतकऱ्यांना वाटा देण्याची मागणी

बेलगाम प्राईड बंगळूर / ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यसभेचे माजी खासदार ईरन्ना कडाडी यांनी आज बंगळूर येथे केंद्रीय साखर उच्चस्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष प्रा. रमेश चंद यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा आणि त्यांच्या आर्थिक हितांचे संरक्षण व्हावे, यासाठी वाजवी व लाभदायक मूल्याचा (एफआरपी) फेरआढावा घेणे, किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करणे, ऊसतोडणी व वाहतूक खर्चाची मर्यादा निश्चित करणे, डिजिटल वे-ब्रिज बसविणे तसेच साखर कारखान्यांमधून निर्माण होणाऱ्या उपपदार्थांच्या नफ्यात शेतकऱ्यांना वाटा देणे, या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, तसेच साखर उद्योगातील आर्थिक लाभात त्यांना न्याय्य वाटा मिळावा, या उद्देशाने या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याची विनंती ईरन्ना कडाडी यांनी समितीचे अध्यक्ष प्रा. रमेश चंद यांच्याकडे केली.
यावेळी माजी आमदार डॉ. विश्वनाथ पाटील, महांतेश दोड्डगौडर, गोविंद कोप्पद यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.




