
बेलगाम प्राईम/ बेळगाव हा महाराष्ट्राचाच भाग असून सीमा भागातील शेकडो रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणासह विविध गंभीर उपचारांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत 4.5 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने तब्बल 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करून उभारण्यात आलेल्या बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी या गावातील बालवीर विद्यालय या शाळेच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. मंगेश चिवटे म्हणाले या संस्थेला महाराष्ट्र शासनाकडून 10 लाख रुपयांचा निधी मिळून त्यातून शाळेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.सदर शाळेच्या विकासासाठी पालकांनी स्वतःहून मदत निधी उभारण्यास सुरुवात केली आहे. अशा संस्था लोकांच्या विश्वासावर उभ्या राहतात असे सांगून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
संपूर्ण महाराष्ट्र या सीमा भागातील प्रत्येक मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्र शासनही या सीमा भागातील मराठी जनतेच्या पाठीशी आहे. त्यामुळेच या भागात मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकली पाहिजे आणि जोपासली गेली पाहिजे. याच भूमिकेतून मुख्यमंत्री धर्मादाय निधीच्या अंतर्गत या शाळेला निधी मंजूर करण्यात आला आहे.
असे त्यांनी स्पष्ट केले. “मला जेंव्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीची जबाबदारी मिळाली तेव्हा सर्व नियम सुलभ करून निधीची व्याप्ती वाढवली. बेळगाव व सीमा भागातील तब्बल 862 गावांचा या निधीमध्ये समावेश केला. शाळा इमारत उद्घाटन समारंभास संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालकवर्ग, विद्यार्थी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




