
बेलगाम प्राईड/ येथील सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळा, मच्छे येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमात शाळेला मदतीचा हात देणाऱ्या दात्यांचा सत्कार करण्यात आला.
शाळेत विशेषतः पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बेंच मोठी कमतरता होती. त्यामुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून अभ्यास करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात फरशी ओलसर असल्यामुळे मुलांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन पॉलिहाइड्रॉन फाउंडेशनच्या वतीने सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीचे ८० बेंच शाळेला उपलब्ध करून देण्यात आले.
या उपक्रमासाठी एसडीएमसी कमिटीचा पुढाकार महत्त्वाचा ठरला. तसेच हायलॉक कंपनीचे मालक श्री दिलीप चिटणीस आणि व्यवस्थापक श्री अनुराज पाटील यांच्या माध्यमातून ही मदत मिळाली. यावेळी शाळेच्या वतीने त्यांचा ऐतिहासिक पुस्तक आणि झाडाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला व त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी SDMC सदस्या पूजा सम्राट होत्या. सूत्रसंचालन शाळेचे कन्नड शिक्षक यांनी केले तर आभार शेरलेकर मॅडम यांनी मांडले. कार्यक्रमाला एसडीएमसी सदस्य, सदस्या,शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




