Uncategorized
Trending

फटाका दुर्घटनेत दृष्टी गमावलेल्या शिवा लोहारच्या उपचारांसाठी मदतीचे आवाहन

बेलगाम प्राईड/ मुंबई, 25 मे 2026 : शहापूर येथील युवक शिवा नारायण लोहार याच्या पुढील नेत्रोपचारासाठी महाराष्ट्र शासनाकडून महत्त्वाची मदत मिळाली आहे. यानिमित्ताने मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख व विशेष अधिकारी श्री. मंगेश चिवटे यांची भेट घेण्यात आली.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या फटाका दुर्घटनेत शिवा लोहार गंभीर जखमी झाला होता. या दुर्घटनेत त्याच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर KLE हॉस्पिटल, बेळगाव येथे विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शहापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे श्री. अनिल अंबरोळे यांच्या प्रयत्नांतून मुख्यमंत्री सहायता निधीतून (CMRF) उपचारांचा संपूर्ण खर्च मंजूर करण्यात आला.

मात्र, या दुर्घटनेत शिवाचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला असून दुसऱ्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारांसाठी त्याला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीचे श्री. रमाकांत कोंडुसकर यांनी रुग्णाच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांची विचारपूस केली. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे करत कार्यकर्त्यांना उपचारासाठी आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.

जे. जे. रुग्णालयातील तपासणीनंतर तातडीने उपचार झाल्यास एका डोळ्यात काही प्रमाणात दृष्टी परत मिळण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यासाठी देशातील नामांकित नेत्रतज्ज्ञ डॉ. सायन बसू यांच्या मार्गदर्शनाखाली एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट, हैदराबाद येथे पुढील तपासणी व उपचार आवश्यक असल्याचे सुचविण्यात आले.

या रुग्णालयात तातडीने संपर्क होऊन भेट घेणे कठीण असतानाच श्री. मंगेश चिवटे यांना संपूर्ण माहिती देण्यात आली. त्यांनी तत्काळ रुग्णालयाशी संपर्क साधून भेट घेण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे दि. 25 मे रोजी दुपारी 1 वाजता शिवा लोहार यांची अधिकृत भेट (अपॉइंटमेंट) निश्चित झाली.

यावेळी श्री. मंगेश चिवटे यांनी हैदराबाद येथील डॉक्टरांशी संपर्क साधून बेळगाव सीमाभाग वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांच्याशी उपचारासंदर्भात समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या विचाराची प्रचिती त्यांच्या कार्यातून दिसून येत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या भेटीप्रसंगी प्राचार्य आनंद आपटेकर, शिवा नारायण लोहार, सत्यम कोणेरी, आकाश पाटील आणि पवन धामणेकर उपस्थित होते.

सध्या शिवा लोहार यांना पुढील तपासणी व उपचारांसाठी हैदराबाद येथे नेण्याची तयारी सुरू असून त्याच्या मित्रपरिवारासह अनेक सामाजिक कार्यकर्ते त्याला पुन्हा दृष्टी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. समाजातील दानशूर व्यक्तींनी या युवकाला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आर्थिक मदतीसाठी संपर्क : पवन धामणेकर – 9901650788.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!