Uncategorized
Trending

बेलगावच्या इतिहासातील पहिला सब-ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग पदक

विजेता; मोहम्मद नुमानने रचला इतिहास

बेलगाम प्राईड/ बेलगाव शहरासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण ठरवत मोहम्मद नुमान हा सब-ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत पदक जिंकणारा बेलगावचा पहिला बॉक्सर ठरला आहे.

बेलगाव मधील पहिले समर्पित बॉक्सफिट क्लब TFC येथे प्रशिक्षण घेणाऱ्या नुमानने २३ ते २९ जून २०२६ दरम्यान पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी  येथे आयोजित ५ व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग  स्पर्धेत अजिंक्यपद कर्नाटकचे प्रतिनिधित्व करत ७० किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले. टीम कर्नाटकने जिंकलेल्या चार पदकांपैकी हे एक असून, मुलांच्या गटात मिळालेले हे एकमेव पदक होते.

राष्ट्रीय स्पर्धेतील नुमानचा प्रवास अत्यंत दमदार ठरला. त्याने प्रथम तामिळनाडूच्या खेळाडूवर RSC ने विजय मिळवला. त्यानंतर दिल्लीच्या खेळाडूवर ५-० अशा एकमताने निर्णयाने शानदार विजय मिळवला. पुढे हिमाचल प्रदेशच्या खेळाडूवर पुन्हा RSC ने मात करत उपांत्य फेरी गाठली. अखेरीस हरियाणाच्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्या विरुद्ध चुरशीची लढत देत त्याने राष्ट्रीय स्तरावर पदक निश्चित केले. राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश करण्यापूर्वी नुमान सलग दोन वेळा कर्नाटक राज्य सुवर्णपदक विजेता ठरला होता.

नुमानचा प्रवास अधिक प्रेरणादायी बनवणारी गोष्ट म्हणजे त्याने सुरुवातीला बॉक्सिंगसाठी नव्हे, तर वजन कमी करण्यासाठी TFC मध्ये प्रवेश घेतला होता. कठोर प्रशिक्षणा दरम्यान त्याने सुमारे २१ किलो वजन कमी केले. सरावातील स्पॅरिंग दरम्यान प्रशिक्षकांनी त्याच्यातील नैसर्गिक बॉक्सिंग कौशल्य आणि लढाऊ वृत्ती ओळखली आणि त्याच क्षणापासून त्याचा राष्ट्रीय पदका पर्यंतचा प्रवास सुरू झाला.

नुमानला एनआयएस प्रशिक्षक गजेंद्र त्रिपाठी आणि प्रशिक्षक सत्येंद्र त्रिपाठी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच निशान कदम यांच्या विशेष मार्गदर्शनाने त्याला नवशिक्या खेळाडूपासून राष्ट्रीय पदक विजेता बनण्याच्या प्रवासात मोलाची साथ मिळाली.

नुमान हा  भारतीय सैन्यातील निवृत्त जवानाचा मुलगा असून, आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय सशस्त्र दलात सेवा करण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याचबरोबर बॉक्सिंगमध्येही सर्वोच्च यश मिळवण्याचा त्याचा निर्धार कायम आहे.

याबाबत TFC चे प्रशिक्षक सत्येंद्र एस. त्रिपाठी म्हणाले “नुमानचा प्रवास हेच आमच्या कार्याचे खरे यश आहे. तो आमच्याकडे चॅम्पियन होण्यासाठी आला नव्हता; तो फक्त स्वतःचे आरोग्य सुधारण्यासाठी आला होता. पण या प्रवासात त्याने स्वतःमधील एक खरा योद्धा शोधला. आमच्यासाठी हीच सर्वात मोठी जित आहे.

सध्या इयत्ता नववीत शिक्षण घेणारा नुमान TFC मध्ये नियमित सराव करत आहे. २०१७ मध्ये स्थापन झालेला TFC हा बेलगावचा पहिला समर्पित बॉक्सफिट क्लब असून स्थापनेपासून आजपर्यंत या क्लबने ५० हून अधिक राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडवले आहेत. तसेच या क्लबमधील २१ खेळाडूंनी भारतीय सशस्त्र दलात सेवा करण्याचा मान मिळवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!