Uncategorized
Trending

येळ्ळूर रस्त्यावरील निसरड आणि धोकादायक  वाहतुकीविरोधात ग्रामस्थांचे अशोका बिल्डकॉनला निवेदन;

अन्यथा ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

बेलगाम प्राईड/हलगा मच्छे – बायपास या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे रस्त्यावरील अनावश्यक माती, काँक्रिट आणि ऑइलमुळे वाढलेली निसरड, तसेच जड वाहनांच्या बेशिस्त वेगामुळे येळ्ळूर मार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. पंधरा दिवसांआधी झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील मातीवर घसरून 3 लोकांचा अपघात होऊन गंभीर इजा झाली होती व पुन्हा बुधवारी झालेल्या पावसात 14 लोक गाडीवर घसरून पडल्यामुळे त्यांना सुद्धा शारीरिक इजा पोहोचली आहे.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आणि निष्पाप नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी येळ्ळूर ग्रामस्थांच्या वतीने ‘अशोका बिल्डकॉन’ कंपनीला कडक शब्दांत निवेदन देण्यात आले. तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

निवेदनातील मुख्य मागण्या आणि मुद्दे:

निसरडीमुळे अपघातांत वाढ: रस्त्यावरील साचलेली माती आणि पाण्याच्या मिश्रणामुळे दुचाकी वाहने घसरून पडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेक वाहनधारक यात गंभीर जखमी झाले असून रस्त्याची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बेशिस्त चालकांना शिस्त लावा: या प्रकल्पावर काम करणारे आणि इतर अवजड वाहनांचे चालक अत्यंत निष्काळजीपणे व सुसाट वेगाने गाड्या चालवतात. या चालकांना कंपनीने तात्काळ समज देऊन त्यांच्या वेगावर नियंत्रण आणावे.

सुरक्षा साधनांचा अभाव: रस्ता कामाच्या ठिकाणी पुरसे दिशादर्शक फलक, गतिरोधक आणि रात्रीच्या वेळी चमकणारे रिफ्लेक्टर्स लावलेले नाहीत. हे सर्व सुरक्षा नियम तातडीने लागू करण्याची गरज आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दररोज कोणाचा ना कोणाचा अपघात होत आहे. रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच येळ्ळूर रस्त्यावर होणाऱ्या ब्रिजची रुंदी आणि उंची वाढवावी जेणेकरून

शेतकऱ्यांना आणि नागरिकांना त्रास होणार नाही. अशोका बिल्डकॉनने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येळ्ळूरवासीय रस्त्यावर उतरून काम बंद पाडतील.” असा इशारा माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य शांताराम कुगजी यांनी दिला.

या निवेदनावर येळ्ळूर गावातील प्रमुख नागरिक, तरुण मंडळी आणि ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देतेवेळी माजी ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, मनोहर पाटील,आनंद पाटील, यलाप्पा जाधव, निखिल पाटील,मधु नांदुरकर, मनोज बेकवाडकर, मधु पाटील, चेतन हुंदरे,महेश पाटील, हेमंत पाटील,सत्यजीत पाटील,अभिषेक पाटील, मारुती यळगुक‌र, मुकेश पाटील, प्रशांत भातकांडे,सोमनाथ बाबले,किशोर हलगेकर, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!