डिव्हाईन प्रोव्हिडन्स कॉन्व्हेंटच्या टेबल टेनिस संघांचे घवघवीत यश
१४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघांची राज्यस्तरीय विजेतेपदावर मोहोर; राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

बेलगाम प्राईड/ चन्नपटण, रामनगर येथे ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या एसजीएफआय राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत डिव्हाईन प्रोव्हिडन्स कॉन्व्हेंट हायस्कूलच्या मुलींच्या संघांनी शानदार कामगिरी करत बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. शाळेच्या १४ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील मुलींच्या संघांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.
बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात बेंगळुरू नॉर्थ संघाचा ३-२ असा पराभव करत विजेतेपद मिळवले. या संघाचे नेतृत्व रिया भंडारी हिने केले. संघात सान्वी प्रशांत, अदिती देशपांडे, श्रेयरक्षा आणि वर्षा यांचा समावेश होता.

१७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात बेळगावच्या संघाने मंड्या संघाचा ३-१ असा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. या संघाचे नेतृत्व तानिष्का कलभैरव हिने केले. राशी व्ही. राव, शिवाली पुजारी, मदीना आणि निकहत या संघाच्या सदस्य होत्या. राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवलेल्या या शानदार विजयामुळे डिव्हाईन प्रोव्हिडन्स कॉन्व्हेंटचे दोन्ही संघ राष्ट्रीय स्तरावरील एसजीएफआय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
दरम्यान, टेबल टेनिसमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल तानिष्का कलभैरव हिचा चन्नपटण, रामनगर येथील डीडीपीआय कार्यालयात विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कर्नाटकातील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे टेबल टेनिसपटू उपस्थित होते.

या दोन्ही संघांसोबत व्यवस्थापक तसेच शारीरिक शिक्षण शिक्षिका सिल्व्हिया डी’लिमा उपस्थित होत्या. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या सिस्टर रोझम्मा यांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.




