धाडसी भारतीय पायलटला मानाचा मुजरा; १८६ प्रवाशांचे प्राण वाचविल्याबद्दल गोगटेनी केले कौतुक

बेलगाम प्राईड/ भारतीय नागरिक म्हणून आपल्या देशाच्या पायलटच्या धाडसाचा आणि प्रसंगावधानाचा जितका अभिमान व कौतुक करावे, तितके कमीच आहे. अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या परिस्थितीतही प्रसंगावधान राखत विमान सुरक्षितपणे उतरवून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या या धाडसी पायलटला देशवासीयांकडून मानाचा मुजरा केला जात आहे.
विमानातील दुर्घटनेच्या प्रसंगी सहपायलट गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या अंगावर अनेक वार झाले, ते रक्तबंबाळ झाले, तसेच कॉकपिटच्या बाहेर फेकले गेले. त्याच वेळी विमान वेगाने खाली येत होते. आणखी काही क्षण परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असती, तर विमानातील १८६ प्रवासी आणि क्रू सदस्यांच्या जीवावर बेतले असते. अनेक कुटुंबांवर कधीही न भरून येणारा आघात झाला असता.
मात्र, अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही पायलटने आपले धैर्य, आत्मविश्वास आणि प्रसंगावधान कायम ठेवले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवत विमान सावरले आणि ते सुरक्षितपणे उतरविले. त्यांच्या या अदम्य धैर्यामुळे विमानातील सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. त्यांच्या या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडतील. ‘आपण त्या विमानात असतो तर आपली काय अवस्था झाली असती?’ हा विचारही अंगावर काटा आणणारा आहे. मात्र, त्या कठीण क्षणी पायलटने दाखविलेल्या धैर्यामुळे असंख्य कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचले.
या शूर आणि कर्तव्यनिष्ठ पायलटला मनापासून मानाचा नमस्कार करण्यात येत असून, त्यांच्या कुटुंबीयांचे पुढील आयुष्य सुख-समाधानाचे आणि आनंदाचे जावे, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली आहे. अशा प्रकारचा जीवघेणा प्रसंग पुन्हा कोणाच्याही वाट्याला येऊ नये, अशी भावनाही व्यक्त करण्यात आली.
पायलटने दाखविलेल्या अतुलनीय धाडसाच्या आणि प्रसंगावधानाच्या सन्मानार्थ त्यांना गणपतीची मूर्ती तसेच सन्मानचिन्ह म्हणून फोटो फ्रेम भेट देण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. ही भेट स्वतःच्या भावना आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून देण्यात येणार आहे. ही भेट पाठविण्यासाठी संबंधित पायलट यांनी कृपया त्यांचा घरचा किंवा कार्यालयाचा पत्ता उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. पुनश्च, धाडसी कामगिरीबद्दल पायलटचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या शौर्याला सलाम!




