Uncategorized
Trending

पाटील माळा येथे नाला व ड्रेनेज विकासकामांचा शुभारंभ

आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या फंडातून १.५ कोटींचा निधी मंजूर

बेलगाम प्राईड/ बेळगाव उत्तर मतदारसंघातील पाटील माळा परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या नाला व ड्रेनेजच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी युवा नेते अमान सेठ यांच्या उपस्थितीत परिसरातील नाला बांधकाम आणि ड्रेनेज विकासकामांचा शुभारंभ केला.

या विकासकामांसाठी मुख्यमंत्री विशेष अनुदानातून एकूण १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार असून, नागरिकांना दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या निचऱ्याच्या समस्यांचे निराकरण करण्यावर भर देण्यात आला आहे.

या प्रकल्पांतर्गत सुमारे १५० मीटर लांबीच्या नाल्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ३५० मीटर लांबीची ड्रेनेज व्यवस्था विकसित केली जाणार आहे. या कामांमुळे सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. परिणामी, परिसरात वारंवार निर्माण होणाऱ्या ड्रेनेजच्या समस्यांवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.

विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत नाल्यांची अपुरी क्षमता आणि ड्रेनेज व्यवस्थेतील अडचणींमुळे रस्त्यांवर तसेच सखल भागांत पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होतात. यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाटील माळा परिसरातील नाला आणि ड्रेनेज व्यवस्थेचे आधुनिकीकरण व सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

या विकासकामांमुळे परिसरातील स्वच्छता, आरोग्य आणि नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार असून, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी संबंधित कामांचा दर्जा उत्तम राखण्यासह सर्व कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर दिला. विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये आणि स्थानिक नागरिकांना या सुविधांचा लवकरात लवकर लाभ मिळावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.

पाटील माळा परिसरातील मूलभूत नागरी सुविधांच्या विकासासाठी मंजूर झालेला १.५ कोटी रुपयांचा निधी आणि सुरू झालेली ही कामे स्थानिक नागरिकांसाठी दिलासा दायक ठरणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!