गोकाक-येरगट्टी मार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर
भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक; चार वर्षांच्या बालकाचाही मृतांमध्ये समावेश, अपघातानंतर ट्रकचालक फरार

बेलगाम प्राईड/ गोकाक तालुक्यातील मालदिन्नी गावाच्या हद्दीत गोकाक-येरगट्टी सार्वजनिक मार्गावर ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.५० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर ट्रकचालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक KA-24/6387 हा येरगट्टीकडून गोकाकच्या दिशेने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे जात होता. मालदिन्नी गावाच्या हद्दीत बाळाप्पा कोत्तल यांच्या गुऱ्हाळाजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक अचानक रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडकला.
MH-12-VT-4389 क्रमांकाची ही कार महाराष्ट्रातील पुणे येथून सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जात होती. या कारमध्ये सहा जण प्रवास करत होते. ट्रकची धडक इतकी भीषण होती की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये चार वर्षांच्या बालकाचा समावेश
या अपघातात ओंकार चंद्रशेखर मांद्रे (वय २८), रेश्मा श्रीकांत मांद्रे (वय ३२) आणि देवांश श्रीकांत मांद्रे (वय ४) यांचा जागीच मृत्यू झाला. हे तिघेही मूळचे लोणंद, ता. फलटण, जि. सातारा येथील रहिवासी असून सध्या पुणे येथे वास्तव्यास होते. या अपघातात श्रीकांत चंद्रशेखर मांद्रे (वय ३४), वंदना चंद्रशेखर मांद्रे (वय ५३) आणि हर्षदा ओंकार मांद्रे (वय २६) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनाही अपघातात गंभीर दुखापत झाली आहे.
ट्रकचालक घटनास्थळावरून फरार
अपघात घडल्यानंतर ट्रकचालकाने ट्रक घटनास्थळीच सोडून पळ काढला. या घटनेची नोंद गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १०६(१), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४ सह १८७ अंतर्गत करण्यात आली आहे.
गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. यू. खिलारी यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेषतः चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याने या दुर्घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.




