येळ्ळूरच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर घोडदौड! रायफलमन दिनेश कार्लेकर यांची टेंट पेगिंग विश्वचषकात तीन कांस्यपदकांवर मोहोर

बेलगाम प्राईड/ बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यदलातील रायफलमन दिनेश गंगाराम कार्लेकर यांनी अश्वारूढ क्रीडा प्रकारातील टेंट पेगिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला आहे. जॉर्डनमधील अकाबा येथे 12 ते 14 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘ITPF टेंट पेगिंग विश्वचषक 2026’ स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत त्यांनी तीन कांस्यपदकांची कमाई केली. त्यांच्या या यशामुळे बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटक राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगातील विविध देशांतील नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धेत रायफलमन दिनेश कार्लेकर यांनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत भारतासाठी पदके मिळवण्यात मोलाचे योगदान दिले.
वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक
दिनेश कार्लेकर यांनी वैयक्तिक टेंट पेगिंगच्या लान्स प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. तसेच वैयक्तिक सर्वांगीण अजिंक्यपद स्पर्धेत लान्स आणि तलवार या दोन्ही प्रकारांमध्ये आपले कौशल्य सिद्ध करत कांस्यपदक मिळवले.
सांघिक स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरी
सांघिक टेंट पेगिंग स्पर्धांमध्येही त्यांनी प्रभावी सहभाग नोंदवला. रिंग अँड पेग (लान्स), लेमन अँड पेग (तलवार) तसेच रिले (लान्स आणि तलवार) या विविध प्रकारांत भारतीय संघाच्या वतीने खेळताना त्यांनी कांस्यपदक मिळवण्यात योगदान दिले.
विश्वचषकाच्या एकूण सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने 436 गुणांची कमाई करत पाचवे स्थान मिळवले. या स्पर्धेत दिनेश कार्लेकर यांच्या कामगिरीने भारतीय संघाच्या यशात महत्त्वाची भर घातली.

येळ्ळूरसह बेळगाव जिल्ह्याचा गौरव
सैन्यदलातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिनेश कार्लेकर यांचे हे यश विशेष कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील येळ्ळूर गावातून पुढे येत त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व केले आणि आपल्या जिद्द, मेहनत व क्रीडा कौशल्याच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
त्यांच्या या कामगिरीमुळे येळ्ळूर गावासह बेळगाव जिल्ह्याची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. त्यांचे यश ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार असून, सैन्यदलातील जवानही क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवू शकतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
रायफलमन दिनेश गंगाराम कार्लेकर यांच्या या अभिमानास्पद यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.




