शिरहट्टीत शेतकऱ्यांच्या कृषी पंप व केबल वायरची चोरी करणाऱ्या दोघांना अटक; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
हुक्केरी पोलिसांची कारवाई; सलग दोन रात्री झालेल्या चोरीच्या घटनांचा छडा

बेलगाम प्राईड/ हुक्केरी तालुक्यातील शिरहट्टी बी.के. गावात शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटारी, बोअरवेल स्टार्टर आणि मौल्यवान केबल वायर चोरणाऱ्या दोन आरोपींना हुक्केरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
शिरहट्टी बी.के. येथील शेतकरी कुमार कल्लाप्पा खोत यांच्या शेतातील विहिरीवर बसविण्यात आलेली ५ एचपी व २ एचपी क्षमतेची विद्युत मोटार, एलटीएलके कंपनीचा बोअरवेल मोटार स्टार्टर आणि सुमारे १ हजार फूट केबल वायर, असा एकूण ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. तसेच याच गावातील बसवंतप्पा साताप्पा दफादोळी यांच्या शेतातील ५ एचपी व २ एचपी विद्युत मोटार आणि बोअरवेल स्टार्टर, असा सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमालही चोरट्यांनी लंपास केला होता.
दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ही चोरी झाल्याप्रकरणी कुमार खोत यांनी हुक्केरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा क्रमांक २२१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.
याशिवाय, शिरहट्टी बी.के. येथील दयानंद अण्णाप्पा रसद यांच्या शेतातील सुमारे ७८ हजार रुपये किमतीचा आणि काडाप्पा कल्लाप्पा कोच्चरगी यांच्या शेतातील विहिरीजवळील ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दि. २६ ऑक्टोबर रोजी रात्री चोरीला गेला होता. याप्रकरणी दयानंद रसद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुक्केरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दोन्ही चोरीच्या प्रकरणांचा तपास पोलीस अधीक्षक के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी आणि गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी डी. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
हुक्केरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. आर. गणाचारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू गस्ती, एएसआय बी. एम. रिजकनवर तसेच ए. एन. मसरगुष्टी, मंजुनाथ एस. कलकूर, कुमार करेन्नवर, ए. एस. जैनापूर आणि आर. एम. पडतारे यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.
तपासादरम्यान वाशेप्पा रामाप्पा हलट्टी (वय ४०) आणि मायाप्पा अडिवेप्पा हलट्टी (वय ४२, दोघेही रा. शिरहट्टी बी.के., ता. हुक्केरी) या दोघांना दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल :
* टेक्सिमो कंपनीची जुनी ५ एचपी विद्युत मोटार – किंमत १३ हजार रुपये. * जुनी २ एचपी विद्युत मोटार – किंमत १० हजार रुपये. * एलटीएलके कंपनीचे जुने बोअरवेल स्टार्टर – किंमत १० हजार रुपये. * काळ्या रंगाच्या पिशवीतील व सुटी मिळून सुमारे ९०० फूट जुनी केबल वायर – किंमत ४५ हजार रुपये.
- अशा प्रकारे आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या दोन्ही चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात हुक्केरी पोलिसांना यश आले आहे.




