Uncategorized
Trending

काळादिन कार्यक्रमासाठी बेळगावकडे जाणाऱ्या शिवसैनिकांना सीमेवर कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले;

महाराष्ट्र पोलिसांकडून विजय देवणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक

बेलगाम प्राईड/ बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या काळादिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक पोलिसांनी अडविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस यांच्यात जोरदार वादावादी होऊन झटापट झाल्याची घटना घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावमध्ये दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळादिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बेळगावच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, कर्नाटक पोलिसांनी सीमा भागातच त्यांना अडवून बेळगावमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला.

यावेळी शिवसैनिकांनी पोलिसांच्या कारवाईला विरोध दर्शविला. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक आणि धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी हस्तक्षेप केला.

 

दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विजय देवणे, विराज पाटील, प्रकाश पाटील, राजू यादव, विनोद खोत, साताप्पा नरके, अवधूत साळोखे, मारुती पुरीबुवा, दिग्विजय पाटील, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, सौ. दीपाली घोरपडे, विशाल देवकुळे, सागर पाटील, विकास पाटील, सतीश पाणारी आणि सरदार टिप्पे यांच्यासह अनेक शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

बेळगावच्या सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील संवेदनशील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर काळादिनाच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या शिवसैनिकांना सीमेवर रोखण्यात आल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सीमेवर झालेल्या या प्रकारामुळे सीमाभागातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!