
बेलगाम प्राईड/ गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या 48 व्या इंडियन मास्टर्स नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतील 75 वर्षावरील महिला दुहेरीमध्ये आपल्या जोडीदारांसमवेत कांस्य पदक जिंकणाऱ्या स्विमर्स क्लब बेळगावच्या अध्यक्षा श्रीमती लता कित्तूर यांचा क्लबच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला
राष्ट्रीय स्पर्धेतील लता कित्तूर यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या सन्मानार्थ केएलएस सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावाच्या ठिकाणी या छोट्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बेळगावचे उद्योगपती आणि प्रसिद्ध क्रीडापटू शिरीष गोगटे यांनी गोगटे परिवार आणि बेळगावच्या नागरिकांच्यावतीने लता कित्तूर यांचा सत्कार केला. तसेच कार्यक्रमादरम्यान ऑस्ट्रेलिया आणि आइसलँड येथे झालेल्या स्पर्धांमध्ये एकत्रितपणे 6 आंतरराष्ट्रीय पदके जिंकणाऱ्या सिमरन गौडळकर, साहिल जाधव आणि बुशरा मुजावर या तीन दिव्यांग (पॅरा) जलतरणपटूंचा देखील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना शिरीष गोगटे यांनी वयाच्या 79 व्या वर्षीही आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्राधान्य देण्याबरोबरच बेळगावसह कर्नाटकचा गौरव वाढवल्याबद्दल लता कित्तूर यांची प्रशंसा केली आणि त्यांच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला श्रीमती गीताताई कित्तूर, उमेश कलघटगी, लक्ष्मण कुंभार, लक्ष्मीकांत, नेतलकर, अक्षय शेरेगार, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर, स्वाती कित्तूर यांच्यासह क्लबचे सदस्य जलतरणपटू, त्यांचे पालक आणि हितचिंतक उपस्थित होते.




