अजयसिंह राजपूत यांच्या घरावर लोकायुक्तांची धाड: सोनं व कोट्यवधींची संपत्ती उघड

बेलगाम प्राईड/ भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून जिल्हा शहरी विकास कक्षातील सहाय्यक कार्यकारी अभियंता अजय सिंह राजपूत यांच्या निवासस्थानासह विविध मालमत्तांवर मंगळवारी लोकायुक्त पथकाने एकाच वेळी छापे टाकत मोठी कारवाई केली.
शहरातील अंजनेयनगर येथील निवासस्थान, तसेच अथणी व हुक्केरी परिसरातील मालमत्तांवर करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान तपास यंत्रणेला मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आढळून आली. छाप्यात एक किलोहून अधिक सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम असल्याचेही उघड झाले आहे.

याशिवाय, बेळगाव शहरात एकमेकांना लागून असलेली तीन घरे त्यांच्या मालकीची असल्याचे समोर आल्याने त्यांच्या संपत्तीच्या स्त्रोताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. ही कारवाई बेकायदेशीर संपत्ती प्रकरणाशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
डीवायएसपी बी. एस. पाटील आणि भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू असून संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी सध्या सुरू आहे. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.




