
बेलगाम प्राईड/ बेळगाव शहरातील कपिलतीर्थ तलावाच्या ठिकाणी भिंत कोसळून दोन बालकांचा मृत्यू होण्याच्या परवाच्या दुर्घटनेची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने सदर तलाव महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तात्काळ पार पाडून संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी त्वरेने तलावाचा विकास साधावा, अशी विनंती तलावाच्या जमिनीचे मालक गोडसे परिवार आणि स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रादेशिक आयुक्त के एम जानकी यांच्याकडे केली आहे.

कपिलतीर्थ तलाव असलेल्या जमिनीचे मालक गोडसे परिवार आणि स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली विनंतीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी प्रादेशिक आयुक्तांना सादर केले. यावेळी शुभम शेळके यांच्यासह उपस्थित प्रमुख मंडळींनी परवा कपिलतीर्थ येथे घडलेल्या दुर्घटनेची आणि त्याला कारणीभूत गोष्टींची माहिती प्रादेशिक आयुक्तांना दिली.

तसेच गोडसे परिवार आणि बेळगाव महापालिका यांच्यातील तलाव हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडण्याची आणि तलावाचा विकासाची विनंती केली. प्रादेशिक आयुक्त जानकी एम. यांनी निवेदनाचा स्वीकार करून चौकशी अंती योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी शेळके यांच्या समवेत विकास कलघटगी, कपिल भोसले आदींसह गोडसे परिवार आणि कपिलतीर्थ तलाव परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




