Uncategorized
Trending

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत बेळगाव कॅन्टोन्मेंटमध्ये श्रमदान

बेलगाम प्राईड/ स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत “एक दिवस, एक तास, एक साथ” या संकल्पनेवर आधारित स्वच्छता श्रमदानाचे आयोजन बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने वेंगुर्ला रोडवरील गांधी सर्कल येथे करण्यात आले. स्वच्छतेबाबत जनजागृती, कचऱ्याचे जबाबदार व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच स्वच्छता अभियानात नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार जगदीश शेट्टर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहून स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. माजी आमदार अनिल बेनके, महांतेश कवटगीमठ, माजी विधान परिषद सदस्य संजय पाटील, स्थानिक राजकीय नेते, प्रभाग सदस्य तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी सदस्य यावेळी उपस्थित होते.

या उपक्रमात इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, विविध स्वयंसेवी संस्था, बँका, बचत गट, सेवाभावी संस्था, विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी व कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मांचलवार सुदाम हरिविजय यांनी खासदार जगदीश शेट्टर, मान्यवर आणि सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाची सुरुवात खासदार जगदीश शेट्टर यांच्या स्वच्छतेबाबतच्या संदेशाने झाली. स्वच्छ परिसर राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी पथनाट्यातून स्वच्छता, कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि कचऱ्याचे उगमस्थळी वर्गीकरण याबाबत जनजागृती करण्यात आली.

स्वच्छता जनजागृतीचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी स्वच्छता, कचरा वर्गीकरण, कचऱ्याची जबाबदारीने विल्हेवाट, पर्यावरण संरक्षण, स्वच्छता ही सेवा तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम याबाबत संदेश देणारे फलक व घोषवाक्ये तयार करून कार्यक्रमस्थळी प्रदर्शित केले.

यावेळी “स्वच्छता ही सेवा २०२६” आणि “घनकचरा व्यवस्थापन नियम,या विषयांवर आकर्षक व माहितीपूर्ण संदेशांसह विशेष सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता. या सेल्फी पॉइंटला विद्यार्थी, अधिकारी, मान्यवर आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वच्छता, उगमस्थळी कचरा वर्गीकरण, जबाबदार कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांचा सहभाग यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सहभागी नागरिकांना सेल्फी काढून सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.

कॅन्टोन्मेंटमधील स्वच्छता राखण्यासाठी दररोज परिश्रम घेणाऱ्या सफाई मित्रांच्या कार्याचा विद्यार्थ्यांनी गौरव केला. विद्यार्थ्यांनी सफाई मित्रांसाठी कौतुकपर संदेश असलेले फलक तयार करून प्रदर्शित केले. स्वच्छ आणि निरोगी कॅन्टोन्मेंटच्या निर्मितीत सफाई मित्रांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.यानंतर खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देत या उपक्रमात सहभागी सर्वांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरलेल्या मानवी साखळीत सुमारे १ हजार ते १२०० नागरिकांनी सहभाग घेतला. विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक नेते, प्रभाग सदस्य, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने या मानवी साखळीत सहभागी झाले होते.

समाजातील विविध घटकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. स्वच्छता ही सेवा अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ, हरित, निरोगी आणि जबाबदार कॅन्टोन्मेंट उभारण्याचा सामूहिक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!