
बेलगाम प्राईड/कर्नाटक सरकारच्या बेळगावातील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे यंदाही भव्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.काळा दिन निषेध फेरी आणि सभा यशस्वी झाल्यानंतर आता महामेळाव्याच्या तयारीला समितीने सुरुवात केली आहे.यासाठी लवकरच व्यापक बैठक घेऊन नियोजन आणि जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
बेळगाववरील हक्क प्रस्थापित करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून सुवर्ण विधानसौध उभारण्यात आला. त्यानंतर दरवर्षी येथे विधिमंडळ अधिवेशन भरविले जाते. या अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पहिल्या अधिवेशनापासूनच महामेळाव्याची परंपरा सुरू ठेवण्यात आली आहे.
केएलई संस्थेच्या परिसरात झालेल्या पहिल्या महामेळाव्याला महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री कै. आर. आर. पाटील उपस्थित होते. त्यानंतरच्या महामेळाव्यांनाही महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी उपस्थित राहून सीमाभागातील मराठी भाषकांना पाठिंबा दर्शविला आहे.
मनोहर किणेकर, कार्याध्यक्ष, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती – मराठी भाषकांना डिवचण्यासाठीच कर्नाटक सरकारकडून २०१३ पासून बेळगावात अधिवेशनाचे आयोजन केले जात आहे. येत्या अधिवेशनाला प्रत्युत्तर म्हणून पहिल्या अधिवेशनापासून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महामेळाव्याचे आयोजन केले जात आहे.”
यंदा कर्नाटक सरकारने ३० नोव्हेंबरपासून अधिवेशन घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, अधिवेशनाच्या अंतिम तारखा अधिकृतरीत्या निश्चित झाल्यानंतर महामेळाव्याची तारीख आणि आयोजनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर समितीच्या माध्यमातून गावोगावी प्रचार आणि जनजागृती करण्यात येईल. काळा दिनाची निषेध फेरी आणि सभा यशस्वी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.




