Uncategorized
Trending

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी रविवारी बेळगावात!

मराठा मंदिर येथे एकदिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन; मान्यवर साहित्यिक, विचारवंतांची उपस्थिती

बेलगाम प्राईड/ पुणे येथे जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या ऐतिहासिक शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी म्हणून बेळगाव येथे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी खानापूर रोडवरील मराठा मंदिर येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हा साहित्यिक सोहळा रंगणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, वाङ्मय चर्चा मंडळ, आर. पी. डी. महाविद्यालय आणि समर्थ युवा फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यात होणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वैभवशाली आणि दिमाखदार पद्धतीने साजरे व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र साहित्य परिषदेने यापूर्वी ज्या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत, त्या सर्व ठिकाणी एकदिवसीय पूर्वसंमेलनांचे आयोजन करण्याची योजना आखली आहे. बेळगावला यापूर्वी तीन वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे या उपक्रमासाठी बेळगावची निवड करण्यात आली असून, यामुळे बेळगावमधील मराठी भाषाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या नांदी संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ संपादक तथा दैनिक तरुण भारतचे मुख्य सल्लागार संपादक  किरण ठाकूर भूषविणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

संमेलनाच्या पहिल्या सत्रात नाशिक येथील विचारवंत डॉ. रमेश वरखेडे यांचे ‘मराठी भाषेसमोरील प्रश्न’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. मराठी भाषेसमोरील सद्यस्थितीतील आव्हाने आणि प्रश्नांवर ते मार्गदर्शन करणार आहेत.

दुसऱ्या सत्रात पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दूरदृष्टीचे अभ्यासक डॉ. भूषण केळकर यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) : संधी आणि आव्हाने’ या महत्त्वपूर्ण विषयावर दृकश्राव्य माध्यमातून व्याख्यान होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हानांचा वेध घेणारे हे व्याख्यान संमेलनाचे खास आकर्षण ठरणार आहे.

तिसऱ्या सत्रात ‘वेणूग्रामचा काव्यस्वर’ हा विशेष काव्यसंगीत कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये बेळगावच्या ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत, कवी कृ. ब. निकुंब आणि शंकर रामाणी यांच्या अवीट गोडीच्या कविता श्रीधर कुलकर्णी, संगीता बांदेकर आणि त्यांचे सहकलाकार सादर करणार आहेत. याशिवाय बेळगाव परिसरातील निमंत्रित कवीही आपल्या स्वरचित कविता सादर करणार आहेत. या सत्राचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध संशोधक व कवयित्री डॉ. मंगला वरखेडे भूषविणार आहेत.

चौथ्या सत्रात मराठी भाषेच्या संवर्धनाला आणि अभिवृद्धीला प्रोत्साहन देणारा प्रातिनिधिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये बेळगाव परिसरातील कन्नड माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकविणारे तसेच मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी अध्यापन करणाऱ्या निवडक शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. यानंतर डॉ. किरण ठाकूर यांच्या अध्यक्षीय समारोपाने संमेलनाची सांगता होणार आहे.

बेळगावच्या समृद्ध मराठी साहित्यिक परंपरेला उजाळा देणारे आणि आगामी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उत्साहपूर्ण नांदी ठरणारे हे संमेलन यशस्वी करण्यासाठी बेळगाव व परिसरातील सर्व मराठी भाषाप्रेमी, साहित्यिक, कवी, वाचक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!