बेळगाव तालुका पेंडॉल अँड इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स वेल्फेअर असोसिएशनचा स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न
मंडप इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स व्यवसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच बैठक : मंत्री सतीश जारकीहोळी

बेलगाम प्राईड/ मंडप आणि इलेक्ट्रिकल डेकोरेशन एक प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायातील लोकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात लवकरच विविध खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात येईल. मंडप इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन,बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बोलताना दिले.
खासबाग धारवाड रोड येथील साई भवन येथे आज सोमवारी बेळगाव तालुका पेंडाल अँड इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महादेव मन्नोळकर उपस्थित होते.बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश अण्णा जारकीहोळी, बेळगावाचे खासदार जगदीश शेट्टर,कोल्हापूर जिल्हा पेडल डीलर्स असोसिएशन अध्यक्ष सागरभाई चव्हाण,बेळगाव तालुका पेंडाल अँड इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स वेल्फेअर असोसिएशन अध्यक्ष नारायण चौगुले,उपाध्यक्ष भाऊसाहेब मनोळकर,दामोदर रतन (उपाध्यक्ष),परशुराम साळुंखे (सचिव) व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, असंघटित क्षेत्रातील सॅंडल आणि इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स व्यवसायातील मालक आणि कामगारांसमोर अनेक अडचणी आहेत. याचा सरकार नक्कीच सकारात्मक रीतीने विचार करेल. महाराष्ट्राच्या धर्तीवर येथील पेंडॉल आणि इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स व्यवसायातील लोकांना सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.
खासदार जगदीश शेट्टर म्हणाले पेंडॉल आणि इलेक्ट्रिकल डेकोरेटर व्यवसायामुळे लाखो लोकांना रोजगार मिळालेला आहे. मात्र असंघटित क्षेत्रातील या व्यवसायाला सरकारकडून अद्यापही कोणत्याच प्रकारचे सुविधा प्राप्त झालेल्या नाहीत, याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. संघटनेच्या माध्यमातून या व्यवसायातील अडीअडचणी दूर करून घेण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा यासाठी सरकार दरबारी आपणही प्रयत्न करू असे आश्वासन शेट्टर यांनी दिले.
सागर भाई चव्हाण यांनी आपल्या मनोगतात चाळीस वर्षांपूर्वी कोल्हापुरात मंडप व्यवसायिकांची महाराष्ट्रातील पहिली संघटना स्थापन झाली. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात संघटनेचे कार्य सुरू झाले.कोल्हापूर जिल्ह्यातील मंडप व्यवसायिकांनी पहिले अधिवेशन भरविले. संघटनेचे आज 86 हजार सदस्य आहेत. संघटनेकडे दीड कोटींचा निधी जमा आहे. शासन दरबारी प्रयत्न केल्यानंतर मंडप व्यवसायिकांना महाराष्ट्र सरकारने काही प्रमाणात सोयीसुविधा सुरू करून दिल्या आहेत. मंडप व्यवसायिकांना गोडाऊन साठी एमआयडीसीत जागा, त्याचबरोबर 50 लाखांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. हे सारे काम संघटनेच्या एकीच्या जोरावर असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अन्य मान्यवरांनी ही समायोचित मार्गदर्शनपर विचार मांडले.
बेळगाव तालुका पेंडाल अँड इलेक्ट्रिकल डेकोरेटर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन व गणेशपूजन केले.बेळगाव तालुका पेंडाल डेकोरेटर असोसिएशनचे अध्यक्ष नारायण चौगुले यांनी उपस्थितांचे स्वागत करताना संघटनेच्या कार्याची माहिती दिली.महादेव मनोळकर यांनी आभार प्रदर्शन केले. अनिल अमरोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बेळगाव पेडल अँड इलेक्ट्रिकल डोनर्स वेल्फेअर असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी प्रयत्न केले.




