बेळगावच्या बॉक्सर रझीन जमादारची सुवर्णपदकाला गवसणी!
कर्नाटक राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत ८० किलो वजनी गटात दमदार कामगिरी; अंतिम फेरीत पहिल्याच फेरीत प्रतिस्पर्ध्याला केले नॉकआऊट

बेलगाम प्राईड/ बेळगावच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद कामगिरी करत टीएफसी बॉक्सफिट क्लबचा (TFC BoxFit Club) बॉक्सर रझीन जमादार याने बंगळुरू येथे झालेल्या १० व्या एलिट पुरुष कर्नाटक राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. ८० किलो वजनी गटातील लाईट हेवीवेट प्रकारात त्याने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
बंगळुरू येथील जे. पी. नारायण स्टेडियममध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रझीनने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ करत विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली.
पूर्व उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्यपूर्व फेरीत त्याने एकमताने घेतलेल्या निर्णयाच्या (Unanimous Decision) आधारे विजय मिळवला. त्यानंतर उपांत्य फेरीत स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ कर्नाटकच्या (SAK) बॉक्सरचा एकमताने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत रझीनने आणखी प्रभावी कामगिरी केली. KOBA च्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पहिल्याच फेरीत जोरदार पंचेसचा मारा करत त्याला नॉकआऊट केले आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
रझीन जमादार याला एनआयएस प्रशिक्षक गजेंद्र त्रिपाठी आणि सत्येंद्र त्रिपाठी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच निशान कदम यांनीही त्याला प्रशिक्षणासाठी सहकार्य केले.
रझीनच्या या यशाबद्दल प्रशिक्षक सत्येंद्र त्रिपाठी यांनी आनंद व्यक्त केला. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि जिद्दीच्या जोरावर रझीनने हे यश संपादन केल्याचे त्यांनी सांगितले. सुवर्णपदक मिळविल्यानंतर आता रझीनचे पुढील ध्येय भारतीय सैन्यदलात (Indian Army) भरती होण्याचे असून, देशसेवा करण्याची त्याची इच्छा असल्याचेही प्रशिक्षकांनी नमूद केले.
रझीनच्या या उल्लेखनीय यशामुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्रातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.




