Uncategorized
Trending

भूतरामट्टी कित्तूर चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात २८ हरणांचा मृत्यू

बेलगाम प्राईड/ बेळगावजवळील भूतरामनहट्टी येथील राणी कित्तूर चन्नम्मा लघु प्राणीसंग्रहालयात गेल्या दोन दिवसांत तब्बल २८ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी आणि शनिवारी घडली. हा आकडा मोठा आहे. मात्र मृत्यूचे कारण संसर्गजन्य असण्याची शक्यता असल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा मृत्यू जिवाणू संसर्गामुळे झाला असावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. मरण पावलेल्यांमध्ये सुरुवातीला ८ हरणांचा समावेश होता. त्यानंतर आज आणखी २० हरणे एकाएकी मरण पावली. या घटनेची माहिती वनमंत्री ईश्वर खंड्रे यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी त्वरित या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पशुवैद्यकांनी केलेल्या तपासणीनंतर जिवाणू संसर्गामुळेच हरणांचा मृत्यू झाला असावा असे प्राथमिक अनुमान आहे. या पार्श्वभूमीवर, मृत्यूच्या नेमक्या कारणांचा आणि संसर्गाच्या स्त्रोताचा शोध घेण्यासाठी म्हैसूर आणि बन्नेरघट्टा येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक आज संध्याकाळपर्यंत बेळगावला दाखल होत आहे.

ए.सी.एफ. नागराज यांनी माहिती देताना सांगितले की, “सध्या सर्व मृत हरणांचे मरणोत्तर परीक्षण करून नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. सुरुवातीला ८ हरणे मरण पावल्यानंतरच आम्ही म्हैसूरच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या होत्या. सद्यस्थितीत इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये संसर्गाची लक्षणे आढळलेली नाहीत.

दुसरीकडे, या संवेदनशील प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी पवन करनिंग यांच्याकडून योग्य आणि त्वरित माहिती मिळत नसल्यामुळे प्रशासनावर आणि त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयाच्या इतिहासातील एवढ्या मोठ्या संख्येने प्राण्यांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असल्याने येथील उर्वरित हरणांच्या आरोग्याची काळजी घेणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!