
बेलगाम प्राईड/ वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी इंटरनेट, सोशल मीडियावर असताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. कोणतीही योजना, नोकरीची संधी, वधू वर प्रस्ताव वगैरेंच्या बाबतीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका असे आवाहन बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केले आहे.
बेळगाव पोलीस आयुक्तालयातून आपल्या एका जाहीर व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांनी जनतेला आवाहन केले आहे. सध्याच्या काळात सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. तेंव्हा कृपया इंटरनेट, सोशल मीडियावर असताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. कोणतीही योजना, नोकरीची संधी, विवाह विषयक प्रस्ताव वगैरेंच्या बाबतीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. संबंधित योजना ज्याने सुरू केली आहे. त्यांच्याशी संपर्क साधून किंवा प्रत्यक्ष भेटून पडताळनी करून नंतरच गुंतवणूक करा.
‘डिजिटल अरेस्ट’ अशी कोणती शब्दावलीच कायद्यामध्ये नाही. जर पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून कोणी तुम्हाला धमकावत अथवा भीती दाखवत असेल, तर तुम्ही जवळच्या पोलीस ठाण्यात जावे. त्या ठिकाणी आमच्या पोलीस अधिकाऱ्याला तुम्हाला आलेल्या फोनबद्दल माहिती देऊन, तो खरा आहे. की खोटा? याची शहानिशा करून घ्यावी किंवा यासाठी 1930 हा एक पोलीस प्रशासनाचा संपर्क क्रमांक आहे.
जर एखादे वेळेस चुकून तुम्ही ऑनलाइन पैसे गुंतवणुकीला फसला गेला असंन तर तात्काळ 1930 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. तसे केल्यास तुमचे पैसे परत तुमच्या खात्यावर जमा होतील या दृष्टीने कारवाई करणे आमच्यासाठी सोयीचे होणार आहे. याव्यतिरिक्त cybercrime.gov.in वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता.
बेळगाव शहर व्याप्तीमध्ये आमचे मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात सायबर क्राईम पोलीस स्टेशन कार्यरत आहे. तुम्हाला सायबर गुन्ह्याबद्दल जर कोणतीही शंका असल्यास या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची भेट घ्यावी. आमचे हे सायबर क्राईम पोलीस स्टेशन 24 तास 12 महिने तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे. अशी माहिती बेळगाव पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिली आहे.




