मराठा लाईट इन्फंट्रीचे डेप्युटी कमांडंट विनोद पाटील विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित

बेलगाम प्राईड/ कोल्हापूरचे सुपुत्र सध्या बेळगाव मध्ये मराठा लाईट इन्फंटी रेजिमेंटल सेंटरचे डेप्युटी कमांडंट म्हणून सेवा बजावणारे कर्नल विनोदकुमार बापूसाहेब पाटील यांना भारतीय सैन्य दलाचे विशिष्ट सेवा मेडल जाहीर झाले आहे.
त्यांचा जन्म गुवाहाटी-आसाम येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथे झाले.तर सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला आणि डेहराडून येथील भारतीय सैन्य अकादमीमध्ये त्यांनी लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणा दरम्यानच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते दोन वेळा राष्ट्रपती सुवर्ण पदक आणि ‘सोर्ड ऑफ ऑनर “ने सन्मानित करण्यात आले.
प्रशिक्षणानंतर ८ जून २००२ रोजी भारतीय लष्कराच्या ६ मराठा लाईट इन्फंटी बटालियनमध्ये त्यांची नियुक्ती झाली. जम्मू आणि काश्मीरच्या बर्फाच्छादित उंचीवर त्यांनी बटालियनचे नेतृत्व केले. त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग-इन चिफ ईस्टर्न कमांड प्रशस्तीपत्र आणि लष्करप्रमुख प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्यात आले.
उच्च दर्जाच्या विशिष्ठ सेवेसाठी त्यांना विशिष्ट सेवा पदकाचे मानकरी होण्याचाही मान मिळाला. परदेशातील मोहिमांवर ६ वेळा भारतीय लष्कराचे प्रतिनिधीत्व करण्याचा सन्मानही त्यांना मिळाला आहे. उंच पर्वतीय प्रदेशांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास दौरा, कंबोडियामध्ये प्रशिक्षण संघाचे सदस्य व आफ्रिकेतील कांगोमध्ये लष्करी निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे.




