४०० कोटी लूट प्रकरणात मोठा ट्विस्टमुख्य संशयित ठाण्याचा बिल्डर किशोर सावळा पोलिसांना शरण

बेलगाम प्राईड/ (चोरला घाट) येथे २००० रुपयांच्या नोटांनी भरलेल्या सुमारे ४०० कोटी रुपयांच्या अवैध चलनाच्या कंटेनर चोरी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी, ठाणे येथील बिल्डर किशोर सावळा (Kishor Savla) याने अखेर पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.
या हाय-प्रोफाइल आर्थिक गुन्ह्यात किशोर सावळा गेल्या काही काळापासून वॉन्टेड/फरार होता. प्रकरणाची व्याप्ती महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरलेली असल्याने तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले होते.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या दरोड्याच्या कटात गुजरातचा हवाला एजंट विराट गांधी याचा सहभाग असल्याचा संशय असून, अवैध पैशांच्या वाहतुकीसाठी हवाला नेटवर्कचा वापर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात आणखी गंभीर आरोप करत, सावळाने अरजीत नावाच्या व्यक्तीला दुबईत खोट्या अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप देखील समोर आला असून, यामुळे प्रकरणाला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
चोरला घाट-बेळगाव परिसरात घडलेल्या या कंटेनर चोरीने देशभर खळबळ उडवली होती. आता मुख्य संशयिताने शरणागती पत्करल्याने, या प्रकरणातील सूत्रधार, पैशांचा प्रवाह, हवाला साखळी आणि इतर सहभागींची नावे उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
सध्या किशोर सावळ्याची SIT कडून कसून चौकशी सुरू असून, येत्या काही दिवसांत या ४०० कोटींच्या लूट प्रकरणातील आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.




