
बेलगाम प्राईड/ गेल्या ५ वर्षे ११ महिने १९ दिवस म्हणजेच जवळपास सहा वर्षे फरारी असलेल्या आरोपीला बेळगाव येथील पाचवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या निकालाला स्थगिती देत काही अटींसह जामीन मंजूर केला आहे.
परशुराम शंकर कोलेकर (वय ४१) रा. तारीहाळ, ता./जि. बेळगाव) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी पुंडलिक गुंडू पाटील (रा.उद्दमबाग, बेळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने २०१२ साली मालवाहतूक वाहन खरेदीसाठी आर्थिक मदतीची मागणी करत हातउसने रक्कम घेतली होती. ऑगस्ट २०१४ पर्यंत रोख व चेक स्वरूपात एकूण २ लाख ९० हजार रुपये आरोपीला देण्यात आले होते. त्यासाठी दोघांमध्ये वचनचिठ्ठी (प्रॉमिसरी नोट) करण्यात आली होती.

मात्र ठरलेल्या मुदतीत रक्कम परत न दिल्याने ४ जानेवारी २०१७ रोजी आरोपीने २ लाख ९० हजार रुपयांचा चेक दिला. तो चेक बँकेत जमा केल्यानंतर खात्यात रक्कम नसल्याने व खाते ब्लॉक असल्याने चेक न वटल्याची माहिती मिळाली. यानंतर फिर्यादीने कायदेशीर नोटीस पाठवून सातवे जे.एम.एफ.सी. बेळगाव न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत दावा दाखल केला.
ट्रायल कोर्टाने ६ जानेवारी २०२० रोजी आरोपीला रक्कम देण्याचा आदेश देत अन्यथा सहा महिन्यांची शिक्षा भोगण्याचा निर्णय दिला. तसेच आरोपीचा जामीन रद्द करून कन्विक्शन वॉरंट जारी करण्यात आले. त्यानंतर हिरेबागेवाडी पोलिसांनी १७ डिसेंबर २०२५ रोजी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले व त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली.
ट्रायल कोर्टाच्या निकालाविरुद्ध आरोपीने पाचवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या निकालाला स्थगिती देत काही अटींसह आरोपीला जामीन मंजूर केला आहे.आरोपीच्या वतीने अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी अपीलात काम पाहिले.




