Uncategorized
Trending

मध्यवर्ती बाजारपेठेतील धुळीच्या रस्त्यानमुळे व्यापारी संतप्त; 

आम. राजू शेठ यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी

बेलगाम प्राईड/ बेळगावच्या मध्यवर्ती बाजारपेठेत सुरू असलेल्या रस्ते खोदकामांच्या संथ गतीमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून याबाबत आमदार राजू सेठ यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. रामदेव गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली, हंस टॉकीज रोड, नार्वेकर गल्ली, गोंधळी गल्ली, मारुती गल्ली, भेंडी बाजार तसेच लगतच्या परिसरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. हे सर्व भाग बेळगाव शहराच्या प्रमुख व्यापारी भागात मोडतात.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे. की गेल्या अनेक आठवड्यांपासून रस्ते खोदून तसेच अर्धवट सोडून दिल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. नियोजन शून्य कामकाजामुळे धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ आणि आरोग्याच्या तक्रारी उद्भवत आहेत. खोल खड्डे आणि उंच-सखल रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

व्यापाऱ्यांनी सांगितले की ग्राहक बाजारपेठेकडे येण्यास टाळाटाळ करत असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. दुकानांतील विक्रीच्या मालावर सतत साचणाऱ्या धुळीमुळे नुकसान होत आहे. याशिवाय खोदकामामुळे अनेक व्यापारी व निवासी भागांमध्ये जवळपास महिनाभर पाणीपुरवठा खंडित असल्याची गंभीर तक्रारही करण्यात आली आहे.

लग्नसराईचा हंगाम तोंडावर असताना काम पूर्ण करण्यात होणारा विलंब हा अत्यंत गैरजबाबदारपणाचा नमुना असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे स्वागतार्ह असली तरी ती नागरिकांच्या आरोग्य व व्यवसायाच्या बळीवर होऊ नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

व्यापाऱ्यांनी दिवसातून किमान चार वेळा पाणी शिंपडून धूळ नियंत्रणात आणावी, अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, खोदलेल्या रस्त्यांवर तात्पुरते डांबरीकरण करावे, काम पूर्ण करण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा आणि कामावर कडक देखरेख ठेवावी, अशा मागण्या केल्या आहेत.

बेळगाव क्लॉथ मर्चेंट्स असोसिएशन (BCMA) आणि ट्रेडर्स कौन्सिलने प्रशासनाशी सहकार्याची भूमिका कायम ठेवत तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!