
बेलगाम प्राईड / बेळगाव शहरासाठी मंजूर झालेल्या सिटीज 2.0 (नवीनीकरण एकात्मिक टिकवून ठेवण्यासाठी) प्रकल्पाच्या बाबतीत गंभीर चिंता निर्माण झाली असल्यामुळे बेळगावसाठी सिटीज 2.0 प्रकल्प सुरक्षित करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा अशी विनंती सिटीझन्स कौन्सिल या संघटनेच्या वतीने प्रादेशिक आयुक्त जानकी के. एम. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
बेळगावचे शिष्टमंडळ सिटीझन्स कौन्सिल सदस्यांनी आज मंगळवारी सकाळी सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक आयुक्त जानकी के एम त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन विनंतीचे निवेदन त्यांना सादर केले. तसेच त्यांना बेळगाव शहरासाठी सिटीज 2.0 हा प्रकल्पाची माहिती दिली.प्रादेशिक आयुक्तांनी निवेदनाचा स्वीकार करून सदर प्रकल्प बेळगावसाठीच सुरक्षित राहील याची काळजी घेतली जाईल असे ठोस आश्वासन त्यांनी दिले.
बेळगाव शहरासाठी सिटीज 2.0 (नवीनीकरण, एकात्मिक आणि टिकवून ठेवण्यासाठी शहर गुंतवणूक) प्रकल्प मंजूर झाला असला तरी त्याच्या अंमलबजावणी विषयी सध्या चिंता निर्माण झाली आहे. भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या प्रतिष्ठित सिटीज 2.0 प्रकल्पांतर्गत झालेली बेळगावची निवड ही आपल्या शहरासाठी अभिमानाची बाब आहे.
सदर अंदाजे 135 कोटी रुपयांच्या मंजूर प्रकल्पाचे उद्दिष्ट घनकचरा व्यवस्थापन प्रणाली मजबूत करणे शाश्वत लवचिक हवामान आणि शहरी पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणे हे आहे. बेळगावसाठी या महत्त्वाच्या प्रकल्पाला सुरक्षित करण्यासाठी सरकार आणि स्थानिक अधिकारी प्रयत्न करत असले तरी त्याच वेळी प्रलंबित आर्थिक योगदान आणि निविदा संबंधित समस्यांबद्दल प्रक्रियात्मक विलंबांबद्दलच्या वाढत्या वृत्तांमुळे नागरिक व भागधारकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
दीर्घकाळापर्यंतचा विलंब प्रकल्पाच्या वेळेवर अंमलबजावणीवर परिणाम होत आहे. या विलंबामुळे प्रकल्प धोक्यात आला असून वेळेवर कारवाई न केल्यास मंजुरी निधी काढून घेतला जाऊ शकतो किंवा दुसऱ्या शहरात वळवला जाऊ शकतो यासाठी आपण या संदर्भात आपल्याला विनंती करतो की आपण बेळगावमधील सिटीज 2.0 प्रकल्प अंमलबजावणीच्या सद्यस्थितीचा आढावा घ्यावा.
संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निधी जलदगतीने देण्यास भाग पाडावे. प्रलंबित निविदा आणि प्रशासकीय प्रक्रिया त्वरित पूर्ण कराव्यात आणि बेळगावसाठी हा प्रकल्प सुरक्षित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत अशा आशेचे तपशील असलेले निवेदन प्रादेशिक आयुक्तांना सादर करण्यात आले आहे. निवेदन सादर करतेवेळी सतीश तेंडुलकर यांच्या समवेत बसवराज जवळी, विकास कलघटगी, मुकेश खोडा, नितीश जैन, कमलेश खोडा आणि सिटीझन्स कौन्सिलचे अन्य सदस्य उपस्थित होते.




